कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना उंबर्डे येथे बुधवारी झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दोन तास कामबंद आंदोलन केले. कर्मचाऱ्यांनी आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या केल्या. त्या पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.
म्युनिसिपल कर्मचारी कामगारसेनेने महापालिका मुख्यालयात हे आंदोलन केले. कामगारसेनेचे उपाध्यक्ष प्रकाश पेणकर व बोडके यांची कामगारांनी भेट घेतली. महापालिकेने केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत उंबर्डे येथे मलउदंचन केंद्राचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नेमणूक केली आहे. प्रकल्पाच्या जागेत केलेल्या खोदकामाची पाहणी करण्यासाठी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता राजू सगर, सर्वेअर श्रीराम झोपले व ट्रेसर मधुकर कोल्हे गेले होते. ते प्रकल्पाची माहिती नागरिकांना सांगत होते. यावेळी काही संतप्त नागरिकांनी सगर, झोपले, कोल्हे यांना जबर मारहाण केली. त्यापैकी झोपले यांची प्रकृती चिंताजनक आहे. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मागील १० वर्षांत महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांवर कर्तव्य बजावत असताना अनेकदा मारहाणीचे प्रकार घडले. त्यामुळे काम कसे करायचे, असा प्रश्न कर्मचाºयांनी उपस्थित केला. काम बंद पाडण्याची घटना घडल्यास दावा दाखल करून वकिलामार्फत न्यायालयीन लढा द्यावा. अधिकारी व कर्मचाºयांना पोलीस बंदोबस्त द्यावा. अन्य महापालिकांच्या धर्तीवर खाजगी सुरक्षारक्षक पुरवले जावेत. झोपले यांच्या उपचाराचा खर्च महापालिकेने करावा. या विविध मागण्या कामगारसेनेने केल्या. आयुक्तांनी या मागण्यांचा नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले आहे. त्यानंतर, कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.पाच जणांना पोलीस कोठडीमलउदंचन केंद्राच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या केडीएमसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी-कर्मचाºयांना बुधवारी मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले कपिल भंडारी, अशोक भंडारी, अविनाश भंडारी, जयेंद्र भंडारी आणि महेंद्र भोईर यांना कल्याण न्यायालयाने गुरुवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.