कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळा, रुग्णालये, महापालिका कार्यालये, प्रभाग कार्यालयांत महिलांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविल्या जाणार आहेत. एक कोटी रुपये खर्चून एकूण १७५ ठिकाणी मशीन बसविण्याच्या प्रस्तावाला सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने हा प्रस्ताव तयार करून पाठविला होता. त्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यापैकी एका निविदाधारकास काम देण्याचा निर्णय घेण्याचा विषय स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवला असता त्याला मंजुरी दिली गेली. महापालिकेच्या ६९ शाळा, महापालिकेचे मुख्यालय, डोंबिवली विभागीय कार्यालय, १० प्रभाग कार्यालये, १३ नागरी आरोग्य केंद्रे आणि रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालय, अशा एकूण १७५ ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविले जाणार आहे. महिलांच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेतला आहे.स्थायी समितीत हा विषय चर्चेला आला असता मनसेच्या नगरसेविका कस्तुरी देसाई म्हणाल्या की, सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन लावण्याचा विषय हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. मात्र, जेथे हे मशीन बसविले जाईल, त्याची देखभाल दुरुस्ती कोण करणार? तसेच या मशीन चोरीला गेल्यावर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेने दोन ठिकाणी ई-टॉयलेट सुरू केले असून, त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न आहे. त्याठिकाणी पाणी उपलब्ध नसते, याकडेही देसाई यांनी लक्ष वेधले.त्यावर प्रशासनाने खुलासा केला की, ‘ज्या कंपनीला हे मशीन बसविण्याचे काम दिले आहे. त्या कंपनीने एक वर्षासाठी मशीनची देखभाल दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.’ मात्र, देखभाल दुरुस्तीचा कालावधी हा चार वर्षांचा असावा, असा मुद्दा सभापती दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केला. पण, दुरुस्तीच्या मुद्यावर निर्णय झालेला नाही. तरीही सभापतींनी देखभाल दुरुस्तीचा खर्च हा एकूण खर्चाच्या तुलनेत १० टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, असाही मुद्दा उपस्थित केला.’>...तर फार्स ठरण्याची शक्यतायापूर्वी महापालिकेच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीच्या ठिकाणी असलेल्या महिला स्वच्छतागृहानजीक सॅनिटरी नॅपकीन व्हेडिंग मशीन बसविण्यात आले होते. मात्र, सध्या ते तेथे कार्यरत नाही. हे मशीन प्रायोगिक तत्त्वावर बसविले गेले होते. त्यामुळे आता नव्याने बसविल्या जाणाऱ्या १७५ सॅनिटरी नॅपकीन व्हेडिंग मशीनची देखभाल दुरुस्ती योग्य वेळी झाली नाही, तर हा केवळ महिला आरोग्यदायी उपक्रमाचा फार्स ठरू शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
केडीएमसी बसवणार सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 1:05 AM