कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पाच महिने केडीएमसीची महासभा झालेली नाही. त्यामुळे महापालिकेचा २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पही मंजूर करता आलेला नाही. परिणामी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत महासभा घ्यावी, अशी मागणी सदस्यांकडून होत होती. अखेर राज्य सरकारच्या सूचनेनुसार महासभा आता आॅनलाइन घेण्याचा निर्णय महापौर विनीता राणे यांनी घेतला आहे.
त्यानुसार ३ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता ही सभा होणार असून, त्यात महापालिकेचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.फेब्रुवारीमध्ये केडीएमसीचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून स्थायी समितीला सादर करण्यात आला होता. अंतिम मंजुरीसाठी मार्चमध्ये महासभेचे आयोजन केले होते. परंतु, कोरोनामुळे मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे सर्व सरकारी कामकाजही ठप्प झाले. यात केडीएमसीची महासभाही होऊ शकली नाही. परिणामी, महापालिकेचा २०२०-२१ चा अर्थसंकल्पही मंजूर करता झालेला नाही.
दरम्यान, जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू झाल्याने यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून महासभा घ्यावी, अशी मागणी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी महापौरांकडे केली होती. तर, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक रमेश जाधव यांनीही नुकतेच निवेदन देत महासभा न झाल्याने अनेक प्रश्न, समस्या लोकप्रतिनिधींना प्रशासनाकडे मांडता आलेल्या नाहीत. याकरिता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत महासभा घ्यावी, अशी मागणी केली होती. सध्या अनलॉकमध्ये सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या, वैद्यकीय उपचार मिळण्यात येणाऱ्या अडचणी, प्रलंबित विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था, सार्वजनिक स्वच्छता, कचºयाची समस्या असे अनेक प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून गंभीर झाले आहेत, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले होते.परिवहन समितीची सभा घेण्याची केली मागणीकेडीएमसी परिवहन उपक्रमातील कामगारांचे संबंधित विषय तसेच कार्यशाळा विभागातील महत्त्वाचे विषय परिवहन समिती सभेअभावी प्रलंबित आहेत. या विषयांच्या मंजुरीसाठी परिवहन समितीची सभा घ्यावी, असे पत्र परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी सचिव संजय जाधव यांना दिले आहे. दरम्यान, आता महासभेच्या आयोजनानंतर परिवहन सभापतींची मागणी मान्य होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.