डोंबिवली : शहरात स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. आतापर्यंत ६३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बहुतांशी रुग्णांची प्रकृती औषधोपचारामुळे सुधारत आहे. केडीएमसीच्या रुग्णालयांमध्ये बुधवारपासून स्वाइन फ्लूच्या २०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी १०० लसी कल्याणमधील रुक्मिणीबाई, तर १०० डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात मिळतील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.स्वाइनचे जूनमध्ये २४ रुग्ण आढळले होते. त्यात आता वाढ झाली आहे. स्वाइनच्या तुलनेत अन्य साथरोगांचे प्रमाण कमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे प्रमाण कमी आहे. त्यासाठीही सातत्याने जागृतीचे काम महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून सुरू आहे. लस उपलब्ध झाली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केडीएमसीच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांनी केले आहे.महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी स्वाइनच्या लसीचा आढावा घेत ही माहिती दिली. त्यासंदर्भात त्यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाची पाहणीही केली होती. त्या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. राजेश लवंगारे यांनी लस उपलब्ध नसून टेमीफ्ल्यू गोळ्या उपलब्ध असल्याचे सांगितले होते. त्याआधारे मोरे यांनी पत्रव्यवहार केला होता. लहान मुलांना स्वाइन झाल्यास त्यांच्यासाठीही लागणारे सिरप आता मिळत आहे. केडीएमसी क्षेत्रातील स्वाइनच्या रुग्णांची माहिती ठाण्यातील आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी देऊ शकतील, असेही डॉ. रोडे यांनी स्पष्ट केले.
केडीएमसी रुग्णालयांत मिळतेय स्वाइनची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:22 AM