कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाकडून शून्य कचरा मोहीम राबविली जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी चाळीत राहणारे नागरिक कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत देत नाही. ते कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे यापुढे कचरा उघड्यावर टाकल्यास दंड आकारण्यात येईल, अशी नोटीस मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ५० चाळींना बजावली आहे.
मनपाने मे २०२० शून्य कचरा मोहीम सुरू केली तेव्हा शहरातील कचराकुंड्या हटवल्या. ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीतच दिला पाहिजे, असा त्यामागचा उद्देश होता. तर, मोठ्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचे प्रकल्प राबवण्यास सांगितले. कचऱ्यात येणारे कपडे वगळे गोळा केले. महिला बचतगटांकडून वापरण्याजोग्या कपड्यापासून कापडी पिशव्या तयार केल्या. तसेच रबर, प्लास्टिक, काचा आदी वेगळे गोळा करण्यासाठी वार ठरविले. प्लास्टिक कचरा गोळा करून तो रिसायकलिंगला दिला. तसेच ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम राबवला. दुसरीकडे आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात मनपाला यश आले.
दरम्यान, चाळीतील रहिवासी कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे मनपाने त्यांना कचरा वर्गीकरण करून तो घंटागाडीत देण्याची सक्ती केली आहे. चाळ परिसरात घंडागाडी दोन वेळा येणार आहे. कचरा उघड्यावर टाकणाऱ्यास सुरुवातीला प्रत्येकी ३०० रुपये दंड आकारला जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे. ही कारवाई करण्यासाठी कल्याण पश्चिमेतील आणि डोंबिवली पश्चिमेतील जवळपास ५० चाळींना नोटिसा देऊन कारवाईचा इशारा दिला आहे.
ग्रामीण भागात कचरा पडूनच
केडीएमसी हद्दीतील २७ गावांमधील कचरा उचलला जात नाही. तो ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला पडून असतो, अशी माहिती माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शून्य कचरा मोहीम राबविली जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळते.
‘कचऱ्याचे फोटो मनपाच्या वेबसाइटवर पाठवा’
कल्याण पूर्वेत कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे कचऱ्याचे फोटो नागरिकांनी काढून मनपाच्या वेबसाइटवर पाठवावेत, असे आवाहन तेथील भाजपचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना केले आहे. त्यामुळे शून्य कचरा मोहीम ही किती फसवी आहे, हे उघड होईल. कचरा उचलला जात नसेल, तर घनकचरा कर नागरिक का भरतील, असा सवाल मोरे यांनी केला आहे.
---------------