- मुरलीधर भवार कल्याण - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फूल मार्केटच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. हे बांधकाम बेकायदा असल्याची नोटिस कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून बाजार समिती प्रशासनाला बजावण्यात आली आहे.
बाजार समितीच्या आवारात महापालिकेच्या कब्जे वहिवाट होती. या कब्जे वाहिवाटीच्या जागेवर फूल मार्केट व्यापारी वर्गाकरीता काही आेटे आणि शेड उभारण्यात आले होते. त्याचे भाडे महापालिका वसूल करीत हाेती. फूल मार्केटचे शेड आणि आेटे धोकादायक असल्याचे सांगत बाजार समितीने त्याठिकाणी फूल मार्केटकरीता नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे सादर केला होता. त्याला महापालिकेने मंजूरी दिली होती. दरम्यान काही व्यापारी न्यायालयात गेल्याने बाजार समितीच्या आवारात पूल मार्केट उभारण्यावरून वाद सुरु झाला. बाजार समितीने फूल मार्केटमधील गाळे आणि शेडवर बुलडोझर फिरविण्याची कारवाई केली. ही कारवाई न्यायायलाच्या आदेशानुसारच करण्यात आल्याचे बाजार समितीने म्हटले होते. फूल मार्केटला नव्या इमारतीच्या बांधकाम प्रकरणी काही व्यापारी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले.
त्यानंतर तत्कालीन आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी फूल मार्केट उभारण्याची परवानगी रद्द केली. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करुन परवानगी देण्याचा विषय झाला होता कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने पुन्हा परवानगी नाकारण्यात आली. या प्रकरणी फूल विक्रेते पुन्हा न्यायालयात गेले. न्यायालयाने बांधकाम परवानगी रद्द करता येत नाही असे म्हटले होते. या आदेशाच्या आधारे फूल मार्केट इमारतीचे बांधकाम सुुर करण्यात आले. बांधकाम सुरु केल्याने बांधकाम परवानगी नसताना बांधकाम सुरु कसे केले अशी हरकत काही व्यापाऱ््यांनी घेतली. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाला बांधकाम अधिकृत असल्याची कागदपत्रे सादर करा अशी नोटिस क प्रभाग अधिकारी संजय साबळे यांनी बजावली होती. त्याची सुनावणी २६ फेब्रुवारी ठेवली होती.
बाजार समितीचे प्रतिनिधी नंदकूमार देशमुख यांनी लेखी निवेदन आणि उच्च न्यायालयाचे २०२३ आणि २०२४ मध्ये दिलेले आदेशाची माहिती सादर केली. त्यावर महालिकेने बांधकाम परवानगी सादर केली नसल्याने सुरु करण्यात आलेले बांधकाम बेकायदेशीर आहे. हे बांधकाम येत्या १५ दिवसात स्वत: बाजार समितीने तोडावे. अन्यथा महापालिका पोलिस बंदोबस्ता बांधकाम तोडण्याची कारवाई करणार आहे. बांधकाम तोडण्याचा खर्चही बाजार समितीकडून वसूल केला जाईल असे महापालिकेने बजावलेल्या नाेटिसमध्ये म्हटले आहे.