लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील गोल्डन गँगला प्रशासनातील अधिकाऱ्यांचे बळ मिळत आहे. त्यामुळेच महापालिकेतील विकासप्रकल्पांना खीळ बसत आहे. बाहेरचा कोणताही नवा कंत्राटदार येथे येऊच शकत नाही, अशी गंभीर स्थिती असल्याचा गौप्यस्फोट स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी शनिवारी केला. गोल्डन गँगला सहकार्य करणाऱ्या व टेंडरमाफिया असेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांवर आधी कारवाई करावी, अशी मागणी करत त्यांनी स्थायीची बैठक तहकूब केली.म्हात्रे म्हणाले की, प्रशासनातील अधिकारी प्रभारी जलअभियंता चंद्रकांत कोलते यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांमुळे टेंडर घोटाळा होत आहे. गोल्डन गँगला सगळी माहिती पुरवण्याचे काम हे प्रशासनातील अधिकारी करतात. त्याचा परिणाम विकासकामांवर होतो. एखाद्या प्रकल्पाचे टेंडर मागवल्यावर मर्जीतील नसलेल्या कंत्राटदारांनी ज्या रक्कमेला टेंडर भरले असेल, त्यापेक्षा कमी दराने अर्ज मागवले जातात आणि मर्जीतील व्यक्तीला कंत्राट दिले जाते. सेतू कार्यालयातील टेंभुळकर, क्लार्क रवी काळे हे देखिल सातत्याने माहिती देतात. ही स्थिती अतिशय गंभीर आहे. सर्वात आधी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा म्हात्रे यांनी घेतला. जामदार यांचा समर्थक कृष्णानी याला कंत्राट न मिळाल्याने कोलते यांनी फाइल मंजूर केलेली नाही. टेंडरमाफियांच्या गँगला कोलते सहकार्य करतात. गोपनीय माहिती टेंभुळकर हे गोल्डन गँगला देतात. त्यामुळे टेंडरमाफियांचे फावते, असा आरोप म्हात्रे यांनी केला. सभा तहकूब रमेश म्हात्रे यांचा संताप झाल्याने शनिवारी महापालिकेतील वातावरण तणावापूर्ण बनले. गोपनीय माहिती फोडणाऱ्या अधिकाऱ्यांना आधी घरी बसवा, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. त्यास स्थायी समितीच्या अन्य सदस्यांनीही पाठिंबा देत सभा सामूहिकपणे सभा तहकूब केली.
केडीएमसीतील अधिकारीच झाले आहेत टेंडरमाफिया
By admin | Published: June 18, 2017 2:14 AM