डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांचा क्षमताविस्तार करून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर टिटवाळा येथे वैद्यकीय रुग्णालय उभारण्यास केडीएमसीच्या आयुक्तांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, लवकरच त्याबाबतचा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे, कॉलेज फॉर फिजिशियन अँड सर्जन (सीपीएस) आणि नर्सिंग कॉलेज त्वरित सुरू करता येणे शक्य असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. महापालिका परिसरातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नाशिक अथवा मुंबईला जावे लागते. त्यामुळे त्यांची गैरसोय होत असून, महापालिकेने वैद्यकीय रुग्णालय उभारण्याची मागणी शिंदेंनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली होती. त्याचसंदर्भात झालेल्या बैठकीस शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.शास्त्रीनगर, तसेच रुक्मिणीबाई रुग्णालयांचा क्षमताविस्तार करून अनेक नवे विभाग सुरू करण्याची आवश्यकता शिंदे यांनी या वेळी व्यक्त केली. रेडिओलॉजीसारखा महत्त्वाचा विभाग सध्या बंद असून, तो एखाद्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्यास देण्याची सूचना त्यांनी केली. त्यालाही आयुक्तांनी मान्यता दिली, तसेच सध्या महापालिकेकडे ज्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आहेत, त्यांच्या आधारे नर्सिंग कॉलेज आणि सीपीएस सुरू करता येणे शक्य असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले असता, त्याबाबतची कार्यवाही लगेच सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. टिटवाळा येथे महापालिकेचा ३८ एकरचा आरक्षित भूखंड असून, राज्य सरकारच्या धोरणानुसार या ठिकाणी पीपीपी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय बांधता येईल. त्यासाठी शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांचा क्षमताविस्तार करण्यात येणार आहे.
टिटवाळ्यात वैद्यकीय महाविद्यालयाचा केडीएमसीचा प्रस्ताव
By admin | Published: February 05, 2016 3:56 AM