कल्याण : गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचा दावा केडीएमसीने केला आहे. कल्याण-डोंबिवली शहरांतील गणपती विसर्जनस्थळी व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील चौकांमध्ये सुरक्षेसाठी २३ महत्त्वाच्या ठिकाणी १०९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तर, महापालिका क्षेत्रात ६८ विसर्जन घाटांवर एकूण ६८ जनरेटर, दोन हजार ९०० हॅलोजन व ८० लायटिंग टॉवर उभारले जाणार आहेत.कल्याणमध्ये २७ विसर्जनस्थळे आहेत. त्यापैकी पूर्वेतील गावदेवी मंदिर तिसगाव, चिंचपाडा रोड, कोळसेवाडी पोलीस ठाण्याजवळ, पश्चिमेत मुंबई विद्यापीठ उपकेंद्र अशा चार ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. डोंबिवली विभागात ३७ विसर्जनस्थळे आहेत. त्यात पूर्वेतील पंचायत विहीर, नेहरू मैदान, अयोध्यानगरी, शिवम हॉस्पिटल, टिळक विद्यामंदिर शाळा, प्रगती कॉलेज, कस्तुरी प्लाझा, न्यू आयरे रोड, उदंचन केंद्र, तर पश्चिम येथील आनंदनगर सम्राट चौक, भागशाळा मैदान येथे घरगुती गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. प्रत्येक विसर्जन घाटावर अग्निशमन स्वयंसेवक, जीवरक्षक, लाइफ जॅकेट, बोट व बोटी अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी कृत्रिम तलावाचा वापर करावा, असे आवाहन महापौर विनीता राणे यांनी केले आहे. रस्त्यांची खड्डेभरणी तसेच साफसफाई व आरोग्यविषयक समस्यांचा जलदगतीने निपटारा होण्याकरिता बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक आरोग्य विभागांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या शनिवार आणि रविवारच्या सार्वजनिक सुट्या रद्द केल्या होत्या.>प्रत्येक प्रभागांमध्ये राबवणार विशेष स्वच्छता मोहीमरस्त्याच्या बाजूचा व ठिकठिकाणी पडलेला कचरा गणेशोत्सवापूर्वी उचलून स्वच्छता राखावी, असे आदेश आयुक्त गोविंद बोडके यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी कालबद्ध कार्यक्र म निश्चित केला आहे. ही मोहीम शनिवारपासून सर्व प्रभागांमध्ये व्यापक प्रमाणात राबवण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यात्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत, तर सहनियंत्रण अधिकारी म्हणून प्रभागांच्या अधीक्षकांवर जबाबदारी आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत महापालिका क्षेत्र पूर्णत: स्वच्छ असणे आवश्यक असल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने ही मोहीम राबवावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.कमानी हटणार कधी? : गोकुळाष्टमीनिमित्त डोंबिवलीत लावलेल्या कमानी अद्याप महापालिकेने काढलेल्या नाहीत. त्यातच, आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांची तसेच त्यांनी उभारलेल्या कमानींची भर पडली आहे. गोकुळाष्टमीच्या कमानी वाहतुकीला अडथळा ठरत असताना गणेशोत्सवासाठी काही ठिकाणी रस्त्यांमध्ये उभारलेल्या मंडपांचीही त्यात भर पडली आहे. यासंदर्भात अतिक्रमणविरोधी विभागाशी संपर्क साधला असता मंडपांची उभारणी वाहतूक पोलिसांच्या नियोजनाखाली झाली आहे. सध्या तरी कोणतीही तक्रार आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गणेशोत्सवासाठी केडीएमसी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 2:42 AM