कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस कोरोना लसींचे १२ हजार डोस मिळाले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. त्यामुळे साेमवारपासून पुन्हा महापालिकेच्या लसीकरण केंद्रांसह काही खाजगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
पालिकेकडे लसीचा साठा संपुष्टात आला होता. महापालिकेने काही एक-दोन केंद्रे वगळता शनिवार आणि रविवार लसीकरण बंद ठेवले होते. महापालिकेस सरकारकडून लसींचा साठा उपलब्ध झाला नसल्याचे लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यामागील कारण हाेते. त्यामुळे सोमवारपासून लसीकरण ठप्प होणार, असे चित्र होते. मात्र, रविवारी रात्री महापालिकेला सरकारकडून १२ हजार लसींचे डोस मिळाले आहेत. महापालिकेच्या ९ लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे. खासगी रुग्णालयांतील काही लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेने दाेन लाख लसींचे डोस मागविले होते. राज्यात लसींचा तुटवडा पाहता टप्प्याटप्प्याने काही लसींचे डोस मिळत आहेत. त्यानुसार, काल रात्री १२ हजार लसींचे डोस मिळाले आहेत. पालिकेस एका दिवसाला किमान चार ते सहा हजार लसींचे डोस लागतात. त्यामुळे दिवसाला सहा हजार लसींचे डोस दिल्यास हा लससाठा दोन दिवसांत संपुष्टात येऊ शकतो. चार हजार लसी दिवसाला दिल्यास किमान तीन दिवस चालू शकतो. तीन दिवसांनी आणखीन लससाठा मागविण्यात आला आहे. तो न मिळाल्यास पुन्हा लसीकरण बंद करण्याची वेळ महापालिकेवर येऊ शकते. रविवारी रुक्मिणीबाई रुग्णालयात लसीकरण बंद असा फलक लावला होता. रात्री लसीचे डोस उपलब्ध होताच आज सकाळपासून त्याठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले होते. लसीकरणासाठी ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांनी रांग लावली होती.
महपालिकेची तारेवरची कसरत
महापालिकेच्या ९ लसीकरण केंद्रांसह खाजगी रुग्णालयांतील केंद्रे धरून एकूण २३ लसीकरण केंद्रे आहेत. केंद्रे वाढविण्याची मागणी केली जात असली तरी लससाठा पुरेसा उपलब्ध झाल्यास लसीकरण केंद्रे वाढविणे शक्य होणार आहे. उपलब्ध असलेल्या लसीकरण केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेस तारेवरची कसरत करावी लागत आहे.
फोटो-कल्याण-लसीकरण
-----------------