कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना चाचणीपश्चात आई-वडिलांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या मुलांना कुठे ठेवायचे? असा प्रश्न आता या कोरोना काळात त्यांच्या पालकांना भेडसावत आहे. त्यासाठी महापालिकेने काही तरी व्यवस्था केली पाहिजे, अशी सूचना संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कदम यांनी केली आहे. त्यासाठी प्रतिष्ठानतर्फे योगदान देण्याची तयारी कदम यांनी दर्शविली आहे.
महापालिका हद्दीत दिवसाला पाच हजार कोरोना चाचणी केल्या जात आहेत. त्यात आई-वडील हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्या मुलांची चाचणी केली जाते. ते निगेटिव्ह आल्यानंतर त्यांची काळजी कोण घेणार? असा प्रश्न आहे. या मुलांची काळजी सोसायटीतील लोक घेण्यास तयार नसतात. या परिस्थितीत लहान मुलांची काळजी घेण्यास घरात वडीलधारी मंडळी नसल्यास माेठा प्रश्न निर्माण हाेताे. कोविड काळात नातेवाइकही त्यांच्या घरी येऊन मुलांची काळजी घेऊ शकत नाहीत. त्यांना बाहेर गावाहून येणाऱ्यांस सोसायटीतील नागरिक मज्जाव करतात. त्यामुळे काही पालक कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरीच क्वारंटाइन होऊन उपचार घेणे पसंत करतात. त्यामुळे मुलांना कोरोनाचा धोका संभवतो. या समस्येचा विचार करून महापालिका प्रशासनाने साेय करून लहान मुलांची काळजी घेण्यास पुढाकार घ्यावा. मुलांसाठी एखादे नॉन कोविड चाइल्ड केअर सेंटर सुरू करावे. त्यासाठी सामाजिक संस्था या नात्याने योगदान देण्यास तयार असल्याचे अध्यक्ष कदम यांनी म्हटले आहे.
---------------