कल्याण: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक केले असताना त्याकडे दुर्लक्ष करणा-यांविरोधात केडीएमसीने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. महापालिका क्षेत्रातील प्रभाग कार्यालयांतर्गत केलेल्या कारवाईत गेल्या दोन दिवसात 1 लाख 35 हजार 450 रूपये इतका दंड वसूल केला आहे.
लॉकडाऊननंतर सद्यस्थितीला अनलॉक 1 मध्ये सर्वच ठिकाणी बहुतांश व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले आहेत. दरम्यान सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेह-यावर मास्क, रूमाल, कापड परिधान करणे बंधनकारक केले आहे. दरम्यान जे नागरिक या नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
या कारवाईसाठी प्रभाग निहाय अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभागक्षेत्र हद्दीमध्ये जे नागरीक सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेह-यावर मास्क, रूमाल, कापड परिधान करणार नाहीत. अशा व्यक्तींना 500 रूपये दंड ठोठावण्यात यावा. जर दंडाची रककम न भरल्यास संबंधित नागरिकांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी असे आदेशही आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार चेह-यावर मास्क न लावणा-या व्यक्तींविरुध्द सर्वच प्रभाग क्षेत्रात जोरदार मोहिम उघडण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसात केलेल्या कारवाईत टिटवाळयातील अ प्रभागात मास्क परिधान न करणा-यांकडून 7 हजार रूपये, कल्याण पश्चिमेतील ब प्रभागात 67 हजार 500 रूपये, क प्रभागात 19 हजार 950 रूपये, पुर्वेकडील ड प्रभागात 14 हजार 500 रुपये, जे प्रभागात 8 हजार रूपये. आय प्रभागात 500 रूपये तर डोंबिवलीतील फ प्रभागात 18 हजार रूपये असा एकुण 1 लाख 35 हजार 450 रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले होते.