कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या करवसुली विभागाने मालमत्ताकर थकविणाऱ्या थकबाकीदारांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. मालमत्ताकराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांचे ३० गाळे महापालिकेच्या वसुली पथकाने शुक्रवारी सील केले. तसेच त्यापोटी दोन लाख रुपये वसूल केले आहे. या ३० गाळेधारकांकडे १३ लाखांची थकबाकी होती.
वडवली व शहाड परिसरात कर निर्धारक व संकलक विनय कुलकर्णी यांनी ही कारवाई केली. महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी थकबाकीदारांच्या विरोधात वसुलीची मोहीम तीव्र करा, असे आदेश दिले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. मांडा टिटवाळा परिसरात अशा प्रकारची वसुलीची कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. महापालिकेने आठ प्रभाग क्षेत्रात सहा हजार ६०६ मालमत्ता धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात निवडणुकीच्या कामाला महापालिकेचे कर्मचारी घेण्यात आले होते. त्यामुळे वसुलीची मोहीम थंडावली होती. परंतु, आता आचारसंहिता संपताच ही वसुली सुरू करण्यात आली आहे.