कल्याण - पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याची कामे करावी लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी या कामाचे प्रस्ताव केडीएमसीच्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी आले. मात्र, कामाच्या निविदांचे प्राकलन स्पष्ट नाही. तसेच विविध यंत्रणांना आकारल्या जाणाऱ्या खड्डे खोदण्याच्या शुल्कापेक्षा ते भरण्यावर जास्त खर्च होत असल्याचा आरोप करत निविदेला शिवसेना सदस्य वामन म्हात्रे यांनी आक्षेप घेतला. त्यावर ही कामे तातडीची असून मंजुरीसाठी आलेले विषय नियमानुसारच असल्याचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हे विषय मंजूर केले जाणार होते; मात्र त्यापूर्वीच आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या अत्यावश्यक विषयांची मंजुरी रखडली होती. यासंदर्भात सभापती म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला होता. त्याविषयी आयोगाने महापालिका आयुक्तांकडे विचारणा केली. दरम्यान, प्रधान सचिव यू. पी. एस. मदान यांनी एक बैठकही घेतली होती. त्यानंतर या विषयांना मंजुरी देण्यास आयोगाने सहमती दर्शवल्याने शुक्रवारी समितीची सभा झाली. या सभेत खड्डे बुजविण्यासाठी ३५ कोटी आणि लहान आकाराची गटारे स्वच्छ करण्यासाठी चार कोटी ५० लाख रुपयांचे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले. यावेळी शिवसेना सदस्य म्हात्रे यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या विषयाला हरकत घेतली. निविदेत कामांचा तपशील दिलेला नाही. रस्ते खोदण्यासाठी महापालिका खड्डा फी २५० रुपये आकारते; मात्र बुजविण्यासाठी ७०० ते ८०० रुपये खर्च करण्याचा दर कंत्राटदाराला कशाच्या आधारे देते. किती रस्त्यावर किती खड्डे आहेत, त्यांचा आकार किती,याबाबत प्रश्न उपस्थित करून मागच्या वर्षीचेच खड्डे बुजविले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले.महापालिकेतील भ्रष्टाचाराला मी कंटाळलो असून आत्महत्या करावीशी वाटते, असे उद्विग्न उद्गार वामन म्हात्रे यांनी काढले. तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्याचा विषय महत्त्वाचा आणि अत्यावश्यक आहे. मात्र, हे काम १०० टक्के पूर्ण झाल्यास मी राजकारण सोडून देईन, असे त्यांनी प्रशासनाला सुनावले. म्हात्रे यांच्या यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभेतील वातावरण ढवळून निघाले.खड्डे शुल्कामधूनच केली जातात कामे - दीपेश म्हात्रेसभापती म्हात्रे यांनी सांगितले की, सरकारी संस्था असलेल्या वीज वितरण कंपनीला रस्ते खड्डे शुल्क म्हणून २५० रुपये आकारले जातात. खाजगी कंपन्यांना वेगळे शुल्क आहे. त्यामुळे सदस्याने घेतलेला आक्षेप चुकीचा आहे.खड्डे शुल्काच्या माध्यमातून महापालिकेत विविध कंपन्यांकडून डोंबिवली विभागातून १६ कोटी ९२ लाख रुपये, तर कल्याण विभागातून सात कोटी ५० लाख रुपये जमा झालेले आहेत. त्यातून रस्त्यावर खोदलेले खड्डे बुजवण्यासाठी डोंबिवलीत १६ कोटी, तर कल्याणमध्ये सहा कोटी खर्च केले जाणार आहेत.याव्यतिरिक्त पावसाळ््यापूर्वी, पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर खड्डे बुजविण्याच्या कामासाठी १२ कोटी खर्चाच्या कामाला मंजुरी दिली आहे. तसेच २७ गावांतील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी दोन कोटींच्या कामास मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर पाऊस सुरू असताना डांबर टाकून खड्डा बुजविता येत नाही. त्याठिकाणी कोल्ड अस्फाल्टचा वापर करून खड्डा बुजविण्यासाठी कोटेशन मागविले आहे.राज्य रस्ते विकास महामंडळ व एमआयडीसीलाही पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने काम सुरू केले आहे. १ जूनपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
खड्डे भरण्यावरून केडीएमसीत झाली खडाजंगी, वामन म्हात्रेंचा निविदेला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:26 AM