लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शून्य कचरा मोहिमेंतर्गत दररोज कचरा उचलला जात असल्याचा दावा केडीएमसी करीत असली तरी आजही काही ठिकाणचा कचरा अनेक दिवस उचलला जात नसल्याचे वास्तव पूर्वेतील एमआयडीसीतील सोनारपाडा रोड, स्टार कॉलनी, संजय नगर परिसरात पाहायला मिळत आहे. अनेक दिवस कचरा एकाच जागी खितपत पडत असल्याने तो पावसामुळे कुजून दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, केडीएमसीबरोबरच येथे रस्त्यावर कचरा टाकणारे नागरिकही याला तितकेच जबाबदार आहेत.
शून्य कचरा मोहिमेंतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरण करून देणे बंधनकारक आहे. तसेच रस्त्यावर कचरा टाकण्यास मनाई आहे. कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवर मनपाकडून दंडात्मक आणि फौजदारी कारवाई होते. परंतु, काही महिने ही कारवाई थंडावली आहे. मनपाच्या कारवाईचे भय न राहिल्याने कचरा रस्त्यावर टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत. याचा उदाहरण सोनारपाडा, स्टार कॉलनी, संजय नगर भागात पाहायला मिळत आहे. या ठिकाणच्या काही सोसायट्यांमधील काही रहिवासी तसेच फेरीवाल्यांकडूनही बिनदिक्कतपणे कचरा उघड्यावर टाकला जात आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे कचरा कुजून दुर्गंधी पसरते. यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे भटकी कुत्रे आणि डुक्कर यांचा वावर वाढला आहे. येथील बहुतांश नागरिक मनपाच्या घंटागाड्यांमध्ये कचरा देत असताना नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई का केली जात नाही, असाही सवाल केला जात आहे. दरम्यान, तक्रार केल्यानंतर कचरा अर्धवट स्थितीत उचलला जात असल्याचे वास्तव येथे पाहायला मिळत आहे.
-----------------------------------------
आयुक्त, उपायुक्तांकडे करावी लागते तक्रार
कचरा अनेक दिवस उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. काही सोसायट्यांमधील नागरिक घंटागाडीत कचरा न देता थेट रस्त्यावर टाकत आहेत. रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्यात फेरीवाल्यांचाही कचरा पडतो. याबाबत तक्रार करूनही कार्यवाही होत नाही. थेट आयुक्त आणि उपायुक्तांना तक्रार अथवा संपर्क करावा लागतो. मग त्यानंतरच कार्यवाही होते; पण तीदेखील पूर्णपणे होत नाही.
- शशिकांत कोकाटे, स्थानिक रहिवासी
---------------
सोनारपाडा रोड, स्टार कॉलनी, संजय नगर येथील कचरा नित्यनेमाने उचलला जात नसल्याबद्दल कोणतीही तक्रार माझ्याकडे आलेली नाही, अशी प्रतिक्रिया केडीएमसी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
-----------