मुरलीधर भवार, कल्याणकल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या ६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाकरिता मागवलेल्या निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने कचऱ्यापासून बायोगॅस, खत निर्मिती आणि प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर हे तीन पर्याय महापालिका निवडणार आहेत. घनकचरा व्यवस्थापनाकरिता महापालिकेने काय उपाययोजना केली याचा जाब २७ जानेवारीस उच्च न्यायालयात द्यायचा असल्याने प्रशासनाची अक्षरश: धडपड सुरु झाली आहे.कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत ५७० मे.ट. कचरा दररोज गोळा होता. महापालिकेत २७ गावे समाविष्ट झाल्याने या गावातून निर्माण होणारा ७० मे.ट. कचऱ्याची वाढ झाली आहे. महापालिकेने घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणारा प्रकल्प न उभारल्याने उच्च न्यायालयाने शहरातील नव्या इमारतींच्या बांधकाम परवानगीस एप्रिल २०१५ मध्ये स्थगिती दिली. महापालिका आधारवाडी येथील क्षमता संपलेल्या डंपिंग ग्राऊंडवर प्रक्रिया न करता कचरा टाकते त्याला न्यायालयाने बंदी केली. आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत आठवेळा निविदा मागविल्या. यावेळी केवळ एक निविदा प्राप्त झाली असून लवकरच अंतिम फैसला होणार आहे. महापालिकेस बारावे व मांडा या दोन ठिकाणी भरावभूमी तयार करायची आहे. मांडा येथील काही जागाच महापालिकेच्या ताब्यात आहेत. उर्वरित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. बारावेकरीता मागवलेली निविदा २५ जानेवारी रोजी उघडण्यात येणार आहे. उंबर्डे व तिसगांव येथे कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचे दहा टन क्षमतेचे प्रकल्प उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. या निविदेस तीन कंत्राट कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. प्रकल्प उभारण्यासाठी किमान दोन कोटी ५० लाख ते तीन कोटी रुपये खर्च येतो. प्रकल्प सुरु केल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुन्हा तीन कोटी रुपये खर्च येतो. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी ५६ टक्के कचरा हा जैव विविध व विघनटशील स्वरुपाच आहे. ५७० शहरातील व २७ गावातील ७० मेट्रीक टन कचरा मिळून एकूण कचरा ६४० मेट्रीक टन गोळा होता. त्यापैकी विघटनशील कचऱ्याचे प्रमाण ५६ टक्के धरले तर ६४० मेट्रीक टन कचऱ्यापैकी ३५० मेट्रीक टन ओला कचरा हा विघटनशील स्वरुपाचा असेल. दहा टन क्षमतेचे किमान ३५ बायोगॅस प्रकल्प उभारावे लागतील. शहरात किमान दहा ते १५ मोकळ््या जागेवर कचऱ्यापासून खत निर्मिती करता येऊ शकते. त्यासाठी फार खर्च नाही. एका ठिकाणी किमान एक लाख खर्च येऊ शकतो. पंधरा जागी राबविण्याचे ठरविल्यास त्याला विघटनशील सुका कचरा आवश्यक असेल. याशिवाय ई वेस्ट गोळा करणारे एक स्टेशन एका कंत्राटदारामार्फत सुरु करण्यासाठी महापालिकेतर्फे निविदा मागविली जाणार आहे.
केडीएमसी तयार करणार कचऱ्यापासून बायोगॅस
By admin | Published: January 25, 2016 1:22 AM