कल्याण : प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील दुवा असलेले आणि कायदेशीर मार्गदर्शनासाठी महत्त्वाचे मानले जाणारे महापालिका नगरसचिवपद गेली आठ वर्षे विविध कारणांमुळे रिक्त राहिल्यानंतर आता कायमस्वरूपी भरण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. आजवर प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून काम चालवणाऱ्या पालिकेने ३० डिसेंबरला मुलाखती घेऊन हे पद भरण्याचे निश्चित केल्याने केडीएमसीला लवकरच कायमस्वरूपी सचिव मिळतील. केडीएमसीचे पहिले नगरसचिव चंद्रकांत माने ३१ डिसेंबर २००७ ला सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून आजतागायत सचिवपदी कोणाचीही कायमस्वरूपी नियुक्ती झालेली नाही. माने सेवानिवृत्त झाल्यानंतर नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात पालिकेचेच अधिकारी असलेले अनिल लाड यांना ५१७, तर अन्य उमेदवार रविंद्र सिर्सीकर यांना ३५० गुण मिळाले होते. मात्र महासभेने लाड यांच्याऐवजी सिर्सीकर यांची निवड केली. ती वादग्रस्त ठरली. ही निवड कायदेशीर तरतुदींना धरून नाही, असा अभिप्राय विधी विभागानेही दिला. निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आले.या पदावर आजवर प्रभारी नियुक्त्या करण्यात आल्या. सहाय्यक आयुक्त असलेले प्रकाश गवाणकर, श्रीधर थल्ला, प्रकाश ढोले यांनी ही जबाबदारी सांभाळली. सध्या सचिवपदाचा कार्यभार सहाय्यक आयुक्त सुभाष भुजबळ यांच्याकडे आहे. महासभा आणि स्थायी, परिवहन, महिला बालकल्याण समिती अशा विविध सभा आणि बैठका चालवण्याची जबाबदारी सचिवांची असते. त्यांच्याकडून सभांना योग्य मार्गदर्शन अपेक्षित असते.मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना घेतलेली स्थायी समितीची वादग्रस्त बैठक असो, की विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला बहाल करण्याची चुकीची कृती असो, कायदेशीर सल्लागार म्हणून सचिवांचे योग्य मार्गदर्शन नसल्याचा हा परिपाक असल्याची खात्री केडीएमसी प्रशासनाला पटल्याने सक्षम आणि कायमस्वरूपी सचिव निवडीची प्रक्रिया सुरू झाली.
केडीएमसीला आठ वर्षांनंतर मिळणार कायमस्वरूपी सचिव!
By admin | Published: December 22, 2015 12:16 AM