कल्याण : केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी दीपक शेलार यांच्यावर १०० रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणात झालेल्या विभागीय चौकशीतून ते दोषमुक्त झाले आहेत. मात्र, खोटी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मात्र, त्याला प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने शेलार यांनी १ मे रोजी महापालिका मुख्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.स्थानिक संस्थाकर वसुली चार वर्षांपूर्वी सुरू झाली होती. त्या वेळी शेलार पारगमन शुल्कवसुली करत होते. लिपिक असलेल्या शेलार यांच्यावर १०० रुपयांचा अपहार केल्याचा ठपका तत्कालीन उपायुक्त गणेश देशमुख, सहायक आयुक्त संजय शिंदे व अधीक्षक सच्चिदानंद कुलकर्णी यांनी ठेवला होता. याप्रकरणी शेलार यांची विभागीय चौकशी झाली. त्यानंतर ते दोषमुक्त झाले. मात्र, या चौकशीमुळे शेलार यांना नाहक चार वर्षे मानसिक त्रास सहन करावा लागला. चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशीअंती शेलार यांना जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवल्याचा शेरा मारला होता. शेलार यांनी ठपका ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासाठी ते तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील यांनी त्यांच्या मागणीची दखल न घेता सरकारदरबारी चुकीचे अहवाल पाठवून स्थायी समितीच्या सभेसमोर चुकीची माहिती दिली, असा आरोप शेलार यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
केडीएमसी कर्मचाऱ्याला चार वर्षे मानसिक त्रास
By admin | Published: April 26, 2017 11:50 PM