कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंगळवारी पश्चिमेतील टावरीपाडा आणि बारावे परिसरातील १४३ बेकायदा नळजोडण्या खंडित केल्या. त्यामुळे पाणीचोरून महापालिकेचा महसूल बुडवणाºयांना चांगलाच चाप बसला आहे.महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतलेल्या साप्ताहिक आढावा बैठकीत पाणीपुरवठ्याची वसुली वाढवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे आणि बेकायदा नळजोडण्यांची शोध मोहीम राबवण्याचे निर्देश जलअभियंता चंद्रकांत कोलते आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांना दिले होते.त्यानुसार केडीएमसीचे ‘ब’ प्रभागाचे पाणीपुरवठा उपअभियंता बाळासाहेब जाधव व त्यांच्या पथकाने मंगळवारी टावरीपाडा आणि बारावे येथील १४३ बेकायदा नळजोडण्यात खंडित केल्या. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. या सर्व नळजोडण्या अर्ध्या इंचाच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून या भागांतील रहिवासी बेकायदा पाण्याचा वापर करत होते. ही बाब देखील या कारवाईतून उघड झाली आहे. महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर बेकायदा नळजोडण्या आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी यासंदर्भात वारंवार महासभेत आवाज उठवून पाणीचोरीकडे लक्ष वेधले आहे.तीन आठवडे कारवाईबेकायदा नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम केडीएमसीने मंगळवारपासून हाती घेतली आहे. तीन आठवडे ही मोहीम चालणार असून, त्यात बेकायदा नळजोडण्या शोधून त्या खंडित केल्या जातील. तसेच दोषींवर कारवाई करावी किंवा त्यांना दंड आकारून या जोडण्या नियमित कराव्यात, अशा सुचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
बेकायदा नळजोडण्यांवर केडीएमसीची टाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 6:02 AM