डोंबिवली- कल्याणडोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात एका गरोदर महिलेला प्रसूतिकरीता दाखल करण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगून तिची प्रसूती करण्यास रुग्णालयाने नकार दिला. त्याच गरोदर महिलेला मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल केले असता तिची विनाशस्त्रक्रिया प्रसूती झाली आहे. या घटनेवरुन महापालिकेच्या रुग्णलायात उपचार न करता रुग्णाना मुंबईला पाठविले जाते ही धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.
दावडी परिसरात राहणाऱ्या प्रिया अशुतोष शर्मा या महिला गरोदर आहे. त्या त्यांच्या माहेरी प्रसूतीकरीता आल्या आहेत. त्यांनी प्रसूतीसाठी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात ३ महिन्यापूर्वीच नाव नोंदणी केली आहे. त्यांच्या प्रसूतीची तारीख जवळ आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना प्रसूतीकरीता शास्त्रीनगर रुग्णलायात रविवारी सायंकाळी पाच वाजता दाखल केले. मात्र त्यांच्या रक्तातील प्लेट लेटस् कमी असल्याने त्यांची प्रसूती करता येणार नाही असे कारण रुग्णलयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना दिले. त्या प्रसूतीकरीता फिट आहेत की नाही याचीही वैद्यकीय चाचणी केली असता त्यांची प्रसूती होऊ शकते असा रिपोर्ट आला.
तरी देखील डा’क्टरांनी त्यांची प्रसूती करणे हे महिलेचा जिविताला धोकादायक ठरू शकते. या सगळ्या प्रक्रियेत सोमवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वेळ वाया गेला. अखेरीस महिलेच्या कुटुंबियांना तिला मुंबईतील शीव रुग्णलयात नेले. त्याठिकाणी पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली. प्रसूती करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा धोका नाही असे त्याठिकाणच्या डा’क्टरांनी सांगितले. आज पहाटे २ वाजताच्या सुमारास या महिलेची विना शस्त्रक्रिया प्रसूती प्रक्रिया पार पडली. तिने बाळाला जन्म दिला आहे. बाळ आणि त्याची आई सुखरुप आहेत.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी सांनी रुग्णालयाकडे पाठपुरावा केला होता. मात्र या घटनेनंतर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा प्रकारच्या घटनामुळे महापालिकेकडून रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात हेळसांड केली जाते. हेच उघड झाले आहे. या प्रकरणी दोषींच्या विरोधात महापालिकेच्या आयुक्त कारवाई करणार आहेत की नाही असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या घटनेविषयी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशा प्रकारची तक्रार त्यांच्याकडे प्राप्तच झालेली नाही असे सांगितले .