कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेत सुरक्षारक्षकांच्या संख्याबळाअभावी कार्यालयांची सुरक्षा बेभरोसे असताना सुरक्षेच्या कारणास्तव सी सी कॅमेरे लावण्यातही प्रशासनाला स्वारस्य नसल्याचे चित्र आहे. महापालिका मुख्यालय आणि दोन मुख्य रूग्णालय वगळता डोंबिवलीतील विभागीय कार्यालय असो अथवा अन्य प्रभाग कार्यालयांमध्ये सी सी कॅमेरे नसल्याने संबंधित कार्यालयांची सुरक्षा वा-यावर पडल्याचे पहावयास मिळत आहे.केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाचे आवार आकाराने लहान आहे. या कार्यालयात कामानिमित्त पदाधिकारी, अधिकारी आणि नागरीकांची वाहनांसह ये-जा सुरू असते. आवार छोटे असल्याने वाहन पार्किंगसाठी जागा उरत नाही. पार्किंगची समस्या दिवसागणिक बिकट बनत चालली आहे. त्यातच पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांचे नातेवाईक देखील प्रत्यक्षात महापालिकेत काम नसतानाही आपली दुचाकी पालिकेच्या आवारात पार्क करून जातात. त्यांना सुरक्षारक्षकांकडून प्रतिबंध केला असता ते सुरक्षा कर्मचा-यांबरोबर हुज्जत घालतात, प्रसंगी दमदाटी करतात. या सातत्याने होणा-या वादाचे रूपांतर भांडणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर विभागीय कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि आवारात सी सी टिव्ही कॅमेरे बसविल्यास याप्रकारांना काहीअंशी अंकुश राहील. विशेष बाब म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना नुकतीच विभागीय कार्यालयातच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घडली होती. येथील सुरक्षा विभागाने संगणक विभागाकडे पत्रव्यवहार करून सी सी कॅमेरे लावण्याची मागणी जून २०१७ मध्ये केली होती. परंतू आजतागायत याची अंमलबजावणी झालेली नाही. आर्थिक चणचणीमुळे या मागणीची पुर्तता झालेली नसल्याची माहीती मिळत आहे. विभागीय कार्यालयात असलेल्या हजेरी पंचिंगच्या ठिकाणी मात्र सी सी कॅमेरा लावण्यात आला आहे पण तो सोयीस्कर नसल्याचे सुरक्षारक्षकांचे म्हणणे आहे. अन्य प्रभाग कार्यालयांंध्येही हेच चित्र आहे. विभागीय कार्यालयात फ आणि ग प्रभागाची कार्यालये आहेत. यासंदर्भात ग प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सी सी कॅमेरे बसविण्यासंदर्भात वरीष्ठांकडे पत्रव्यवहार केल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
केडीएमसीला वावडे सी सी कॅमेरांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 4:14 PM
कल्याण: एकिकडे कल्याण डोंबिवली महापालिकेत सुरक्षारक्षकांच्या संख्याबळाअभावी कार्यालयांची सुरक्षा बेभरोसे असताना सुरक्षेच्या कारणास्तव सी सी कॅमेरे लावण्यातही प्रशासनाला स्वारस्य नसल्याचे चित्र आहे. महापालिका मुख्यालय आणि दोन मुख्य रूग्णालय वगळता डोंबिवलीतील विभागीय कार्यालय असो अथवा अन्य प्रभाग कार्यालयांमध्ये सी सी कॅमेरे नसल्याने संबंधित कार्यालयांची सुरक्षा वा-यावर पडल्याचे पहावयास मिळत आहे.
ठळक मुद्देविभागीयसह अन्य कार्यालयांची सुरक्षा वा-यावर