कल्याण : केडीएमटीचे प्रमुख कारागीर अनंत कदम यांच्या राजीनामा प्रस्तावावरून शिवसेनेचे सदस्य संतोष चव्हाण आणि मनसेचे प्रल्हाद म्हात्रे हे बुधवारच्या परिवहनच्या सभेत आमने-सामने आले. कदम यांचा राजीनामा मागे घेण्याच्या प्रस्तावाचा कोणताही विचार न करता तो तत्काळ मंजूर करावा, अशी भूमिका म्हात्रे यांनी घेतली होती, तर विधी विभागाचा अभिप्राय आल्यानंतर निर्णय घेऊ, असे चव्हाण यांचे म्हणणे होते. त्यामुळे सभापती सुभाष म्हस्के यांनी मध्यस्थी करत हा प्रस्ताव तूर्तास स्थगित ठेवत असल्याचे जाहीर केले.कार्यशाळा व्यवस्थापकाची जबाबदारी असलेल्या कदम यांनी २१ सप्टेंबर २०१७ ला राजीनामा दिला होता. तत्पूर्वी १६ सप्टेंबरपासून ते विनासंमती व कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर गैरहजर होते. दरम्यान, २७ आॅक्टोबर २०१७ ला राजीनामा मागे घेत असल्याबाबत उपक्रमाला त्यांनी पत्र दिले होते. याप्रकरणी केडीएमटी प्रशासनाने विधी विभागाकडे याबाबतचे मार्गदर्शन मागितले होते. परिवहन समितीनेही विधी विभागाकडून अभिप्राय मागवावा, त्यानंतर निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले होते. मात्र, बुधवारच्या सभेत पुन्हा कदम यांचा राजीनामा मागे घेण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.यावेळी झालेल्या चर्चेत प्रशासनाला याआधी विधी विभागाने दिलेल्या अभिप्रायाच्या आधारे समितीला असलेल्या अधिकारात कदम यांचा राजीनामा तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी म्हात्रे यांनी लावून धरली. तर, समितीने आदेश दिला आहे, पण विधी विभागाचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करू, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली. यावेळी दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम होते. यात म्हस्के यांनी मध्यस्थी करत समितीने मागितलेल्या विधी विभागाच्या अहवालानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल, असेजाहीर केल्यानंतर कदम यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही.बसगाड्यांमध्ये सीएनजी कीट बसवाप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच पर्यावरणसंतुलनासाठी उपक्रमातील बसगाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर डिझेल इंजीनच्या बदली सीएनजी कीट बसवण्याबाबतचा प्रस्तावही सभेत मंजूर करण्यात आला. हा प्रस्तावही चव्हाण यांनीच मांडला होता.सीएनजी केंद्र उभारणीचादेखील विचार व्हावा तसेच यासाठी खंबाळपाडा आगाराचा विचार व्हावा, अशी उपसूचना अनुक्रमे भाजपाचे सदस्य संजय राणे आणि सेनेचे सदस्य मनोज चौधरी यांनी केली.उत्पन्नासाठी जाहिरातीचा आधारकेडीएमटीची बिकट अवस्था पाहता उत्पन्नाचे स्रोत म्हणून परिवहन उपक्रमाच्या गणेशघाट, वसंत व्हॅली आणि खंबाळपाडा आगार येथील दर्शनी भागात होर्डिंग्ज उभारून जाहिरात फलक उभारण्याचा प्रस्ताव चव्हाण यांनी मांडला होता. तो एकमताने मान्य करण्यात आला.परिवहनच्या ताब्यातील मोकळ्या भूखंडावरहीजाहिरात फलक लावण्याबाबत निविदा प्रक्रियेतून कंत्राट देऊन त्या माध्यमातून उत्पन्न मिळवावे, असे मत यावेळी मांडण्यात आले.
केडीएमटी कारागीर राजीनामा प्रकरण : सेना-मनसे आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 6:51 AM