कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणा-या रेल्वेला समांतर रस्त्यावरून केडीएमटीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. जुलै महिन्यापासून ही बससेवा सुरू झाली खरी, परंतु बस थांबत नसल्याने ती निरुपयोगी ठरली आहे. परिणामी, येथील प्रवाशांच्या नशिबी रिक्षा शोधण्याचाच पर्याय राहिला आहे.कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा जवळचा पर्याय म्हणून समांतर रस्त्याचा वापर होतो. सध्या या रस्त्याभोवती कॉम्प्लेक्स उभी राहिली आहेत. काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने बससेवा सुरू केली. पण, नंतर ती प्रतिसादाअभावी बंद केली. या भागातून डोंबिवली व कल्याण स्थानकांकडे जाणाºयांची होणारी असलेली परवड पाहता केडीएमटीने या मार्गावरून बस सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली. भाजपाच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनीही पत्र दिले होते. शिवसेनेचे परिवहन सदस्य मनोज चौधरी यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर २४ जुलैपासून या मार्गावरून बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना आणि भाजपाने मोठ्या प्रमाणावर श्रेयासाठी बॅनर लावले. बससेवेच्या शुभारंभाला भाजपाच्या नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी उपस्थिती लावली. बसथांबे, भाडेदरही निश्चित करण्यात आले. पण, सध्या या थांब्यांवर केवळ लोखंडी खांब उभारण्यात आले आहेत. त्यावर, ठिकाणांची नावे तसेच बसचे वेळापत्रक लावण्यात उपक्रमाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. सध्या या मार्गावरून बस धावत असली, तरी ती थांबत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत. बस शुभारंभाच्या वेळी मोठा गाजावाजा करण्यात आला, पण सेवेच्या नावाने बोंब असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. श्रेयाची बॅनरबाजी करणारे आता गेले कुठे, असाही त्यांचा सवाल आहे. बस निरुपयोगी ठरत असल्यान रिक्षानेच इच्छितस्थळी जावे लागत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.‘लोकमत’ने नगरसेविका चौधरी यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, परिवहन सदस्य चौधरी यांनीही बस थांबत नसल्याबद्दल तक्रारी आल्याचे सांगितले. याबाबत, उपक्रमाच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार आहे. ‘हातदाखवा व बस थांबवा’ अशा योजनेबाबतही पत्रव्यवहार केल्याची माहिती त्यांनी दिली.गंभीर दखल घेतली जाईलमार्गावरून बस चालू करूनदेखील सुविधा प्रवाशांना मिळत नसेल, तर याची गंभीर दखल घेतली जाईल. मी स्वत: या मार्गाचा दौरा करेन, असे परिवहन सभापती संजय पावशे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बस चालू करून काय फायदा?बस चालू केल्यामुळे सोयीचे ठरेल, अशी भावना होती. थांब्यावरही ती थांबवली जात नाही, हा अनुभव वारंवार आम्हाला येतो. याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. बस थांबत नसल्याने आजही आम्हाला रिक्षानेच प्रवास करावा लागतो, असे मत प्रवासी योगेश पटेल यांनी मांडले. नवी मुंबईलाही बस जावी! : केडीएमटीच्या बसचे वेळापत्रक निश्चित नसल्याने ती बस कुठे आणि कधी येते, याची माहिती मिळत नाही. येथून नवी मुंबईला कामानिमित्त जाणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळच्या सुमारास एखादी बस तरी त्यांच्यासाठी सोडावी, अशीही मागणी असल्याचे प्रवासी सागर शिंगोटे यांनी सांगितले.
केडीएमटीची बस चालू झाली खरी, पण थांबतेय कुठे...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:30 AM