कल्याण : मार्च संपायला आला असतानाही फेब्रुवारीचे वेतन न मिळाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन छेडले. कर्मचाऱ्यांच्या आक्रमक पवित्रा पाहून महापालिका प्रशासनाने तातडीने अनुदानाचे धनादेश उपक्रमाकडे सुपूर्द केले. तासाभरात वेतन केडीएमटीच्या आखात्यात अदा केले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या हातात पगार न पडल्याने त्यांची होळी कोरडीच होणार आहे.केडीएमटीत ५३८ कर्मचारी आहेत. वेतन आणि खचार्तील तफावतीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न वारंवार उद्भवत आहे. त्यातच केडीएमसीकडून ७० लाखांचे अनुदानही वेळेत मिळत नसल्याने महिन्याच्या १० तारखेच्या आत वेतन देणे केडीएमटीला शक्य होत नाही. केडीएमटीचे उत्पन्नही अपुरे आहे. त्यामुळे अनुदान एक कोटीच्या आसपास मिळावे, अशी केडीएमटची अपेक्षा आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी परिवहन कर्मचारी कामगार सेना या युनियनच्या नेतृत्वाखाली मंगळवारी काम बंद आंदोलन छेडले. गणेशघाट आगारात कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडल्याची माहिती मिळताच प्रशासनाची धावपळ उडाली. केडीएमटीचे लेखाधिकारी सुधाकर आठवले यांनी युनियनचे सरचिटणीस शरद जाधव यांना तासाभरात पगार देण्याचे आश्वासन दिले.
केडीएमटी कर्मचाऱ्यांची होळी यंदा कोरडीच
By admin | Published: March 23, 2016 2:06 AM