कल्याण : केडीएमटीतील ६८ बस कंत्राटी पद्धतीवर चालवल्यास त्यातून वार्षिक ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, त्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याने त्याचे भिजत घोंगडे कायम आहे. उत्पन्नाची बाजू मजबूत करण्यासाठी प्रशासनाने हा विषय गांभीर्याने मार्गी लावावा, याकडे परिवहन सदस्याने लक्ष वेधले आहे.केडीएमटीने ६८ बस चालवण्यासाठी निविदा काढली होती. कंत्राटदारानेच चालक नेमून बस चालवाव्यात, तसेच बसची देखभाल दुरुस्ती करावी. परिवहनकडून वाहक व इंधन पुरवले जाईल. कंत्राटदाराने दिवसाला आठ लाखांचे उत्पन्न द्यावे, अशा अटी निविदेत होत्या. मात्र, या निविदेस प्रतिसाद मिळाला नाही.कंत्राटदाराने दररोज आठ लाख दिल्यास परिवहनला दर महिन्याला दोन कोटी ४० लाख तर वर्षाला जवळपास ३० कोटींच्या आसपास उत्पन्न मिळू शकते. त्यातून परिवहनला उभारी मिळू शकते, याकडे परिवहन सदस्य संतोष चव्हाण लक्ष वेधले. उपक्रमाच्या मार्गावरच कंत्राटदाराने बस चालवल्यास उपक्रमातील कर्मचारी कामचुकारपणा करत होते का, हे स्पष्ट होईल. निविदेतील अटी शिथील केल्यास कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळेल, असे चव्हाण म्हणाले.‘तेजस्विनी’लाही ब्रेकमहिलांसाठी चार ‘तेजस्विनी’ बस खरेदी करण्यासाठी सरकारने केडीएमटीला एक कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे. या बससाठीही काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातील अटीशर्ती शिथील करण्याची गरज आहे. या पूर्वी टाटा कंपनीकडून बस खरेदी झाली होती. त्यामुळे आताही या कंपनीकडून निविदेला प्रतिसाद मिळू शकतो, असे चव्हाण म्हणाले.
केडीएमटीला बससाठी कंत्राटदार मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:47 PM