कल्याण : ठाकुर्ली स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवलीदरम्यान मार्गावर बुधवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ९.४५ ते दुपारी १.४५ पर्यंत चार तास वाहतूक बंद राहणार आहे. यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी केडीएमटी सज्ज झाली असून ब्लॉकदरम्यान २० विशेष बस सोडल्या जाणार आहेत. मदतीला केडीएमटी धावून आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सुटीच्या दिवशी प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने रेल्वे प्रशासनाने बुधवारी नाताळच्या सुटीचे औचित्य साधत चार तासांचा विशेष ब्लॉक घेतला आहे. कल्याणहून कसारा-कर्जतकडे तर डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी रेल्वे वाहतूक सुरू राहणार आहे. ठाकुर्ली स्थानकात पुलाचे गर्डर उभारण्यात येणार असल्याने कल्याण-डोंबिवलीदरम्यानची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे कसारा-कर्जत तसेच छ.शि.म.ट. कडे जाणाऱ्या प्रवाशांना कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकांचा आधार घ्यावा लागणार आहे. यात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटी उपक्रमाकडून जादा बस सोडल्या जाणार आहेत. २० बस कल्याण-डोंबिवली मार्गावर सोडल्या जाणार आहेत. कल्याण आणि डोंबिवली रेल्वेस्थानकातून या बस दर पंधरा मिनिटांनी प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती केडीएमटी उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिली. रेल्वेचा ब्लॉक सकाळी ९.४५ च्या सुमारास सुरू होणार असल्याने सकाळी ९ वाजल्यापासून या बस प्रवाशांसाठी चालवल्या जातील. ब्लॉक संपेपर्यंत बस कल्याण डोंबिवली मार्गावरून धावतील, असेही खोडके यांनी सांगितले. केडीएमटीने उपलब्ध केलेल्या या सुविधेमुळे रेल्वेच्या ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान प्रवाशांचे होणारे हाल काही प्रमाणात टळणार आहेत.रिक्षाचालकांनाही देणार सूचनारेल्वेचा एखादा ब्लॉक असो अथवा ठप्प पडलेली रेल्वे वाहतूक या परिस्थितीचा रिक्षाचालकांकडून गैरफायदा उठवला जातो. मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जाते.कल्याण-डोंबिवली रिक्षाने प्रवास करताना प्रामुख्याने शेअर पद्धतीला अधिक पसंती आहे. सध्या प्रतिप्रवासी साधारण २५ रुपये भाडे आकारले जाते. जर शेअरने जायचे नसेल तर १०० ते १५० रुपयांपर्यंत भाडे प्रवाशाला रिक्षाचालकाला द्यावे लागत आहे.यासंदर्भात कोकण रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवाशांना त्रास होणार नाही, यासंदर्भात रिक्षाचालकांना सूचना केल्या जातील. रिक्षाचालकांकडून जादा भाडे आकारल्यास कल्याणमधील रिक्षा संघटनेच्या कार्यालयाशी प्रवाशांनी संपर्क साधावा, असे आवाहन पेणकर यांनी केले आहे.