- मुरलीधर भवारकल्याण : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या केडीएमटीला आता कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडीचाही फटका बसत आहे. त्यामुळे बसच्या दररोज ४५ टक्के फेºया रद्द कराव्या लागत आहेत. परिणामी २० दिवसांत २४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.केडीएमटीचे दर दिवसाला आठ लाखांचे उत्पन्न होते. मात्र, ते तीन लाखांच्या आसपास घटले. त्यामुळे स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी परिवहनकडे उत्पन्नवाढीसाठी कृतीआराखडा मागितला होता. त्यानुसार परिवहन प्रशासनाने तो सादर करून उत्पन्न देणाºया मार्गावर जास्तीच्या गाड्या चालविण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिवहनचे उत्पन्न मे महिन्यापासून तीन लाखांवरून पाच लाखापर्यंत वाढले.सध्या मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीसाठी बंद असल्याने तेथील वाहतूक कल्याण-डोंबिवली शहरातून वळवली आहे. त्यामुळे भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावर ताण पडत असल्याने शहरात दररोज कोंडी होत आहे. उत्पन्न मिळवून देणाºया कल्याण-भिवंडी मार्गावर एका फेरीसाठी चार तास लागतात. त्यामुळे या मार्गावरील फेºया घटल्या आहेत. कल्याण-मलंग गड, कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल, कल्याण-कोकण भवन या मार्गांवरील फेºयाही कोंडीमुळे रद्द कराव्या लागत आहेत.कल्याणचे प्रवेशद्वार समजली जाणारी ठिकाणेही कोंडीच्या विळख्यात आहेत. कल्याण-शहाडपूल, भवानी चौक, मुरबाड रोडवरील सुभाष चौकात, कल्याण स्टेशन परिसरात, सहजानंद चौक, दुर्गाडी खाडीपुलावर प्रचंड कोंडी होते. याशिवाय पत्रीपूल तर कोंडीचे जंकशन बनला आहे. भिवंडीहून येणारी वाहने दुर्गाडी पुलावरून गोविंदवाडी बायपासने पत्रीपुलावरून शीळ येथून ठाणे, नवी मुंबई, पनवेलकडे जातात. तसेच तेथून आलेली वाहने शीळनंतर पत्रीपुलावरून गोविंदवाडीहून भिवंडीकडे जातात. तसेच कल्याण शहरात ये-जा करणारी वाहनेही याच पुलावरून जातात. सर्वत्र होणाºया या कोंडीचा फटका केडीएमटीलाही बसत आहे. त्यामुळे दररोज एक लाख २० हजाराचे सरासरी उत्पन्न घटले आहे. केडीएमटीच्या तिजोरीत दररोज चार लाख २६ हजार ते चार लाख ३० हजार रुपये जमा होतात. दररोज सर्व बसच्या एकूण १६ हजार किलोमीटर फेºया होतात. मात्र, सध्या कोंडीमुळे १० ते ११ हजार किलोमीटर इतक्याच फेºया होत आहेत.शहरातून सहा आसनी रिक्षा, तसेच खाजगी वाहने बेकायदा प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे परिवहनचे उत्पन्न घटत आहे. परिणामी बेकायदा वाहतूक रोखावी तसेच कोंडी दूर करावी, अशी मागणी केडीएमटी प्रशासनाने वाहतूक शाखा आणि आरटीओकडे पत्राद्वारे केली आहे. परिवहनचे उत्पन्न न वाढल्यास त्याचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. मे महिन्यापासून उत्पन्न वाढण्यास सुरुवात झाली असताना कोंडीमुळे उत्पन्न वाढीस पुन्हा फटका बसत आहे. त्यामुळे खाजगीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केडीएमटीला कोंडीचा फटका; दर दिवसाला ४५ टक्के फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 2:29 AM