कल्याण : केडीएमटीच्या दुरवस्था झालेल्या गणेशघाट येथील बस आगाराचा लवकरच कायापालट होणार आहे. या आगारात डांबरीकरण व फर्निचरची कामे तसेच वसंत व्हॅली व खंबाळपाडा ही आगारे विकसित करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील साडेचार कोटींच्या कामांचे प्रस्ताव सोमवारच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी केडीएमटी प्रशासनाने दाखल केले आहेत.गणेशघाट आगाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तेथे दलदल असून कार्यालयेही मोडकळीस आली आहेत. खंबाळपाडा आगार सुरू करण्यासंदर्भात वारंवार ठराव करूनही त्याला मुहूर्त मिळालेला नाही. महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या तेथे उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे त्या तेथून तत्काळ हटवा, असे परिवहन सदस्यांनी सातत्याने प्रशासनाला सांगूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या बस ठेवायच्या कुठे, असा प्रश्न प्रशासनापुढे आहे. वेळप्रसंगी मेट्रो मॉलच्या आवारात बस ठेवल्या जात आहेत. त्या दररोज रस्त्यावर आणण्याऐवजी आलटूनपालटून चालवल्या जातात. आगारांअभावी बसच्या संचालनावर परिणाम झाला आहे.खंबाळपाडा आगाराला एकप्रकारे डम्पिंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सध्या तेथे कचरा गाड्यांचे पार्किंग केले जाते. तसेच चिखलामुळे दलदल आहे. पुरेसा वीजपुरवठा व पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. खडकपाडा परिसरातील वसंत व्हॅली आगारातही चिखल असल्याने काहीप्रसंगी बस आगाराबाहेर उभ्या कराव्या लागत आहेत. गणेशघाट आगारात डांबरीकरण न झाल्याने सध्या चिखल झाला आहे. सध्या ११० बस या आागारात उभ्या केल्या जातात. त्यामुळे त्या बाहेर काढताना गोंधळ उडतो. चालकांना चिखलातूनच वाट काढत बसपर्यंत जावे लागते. बऱ्याचदा चालक पाय घसरून जखमी झाल्याचे प्रसंगही घडले आहेत. तसेच अन्य कारणांमुळे सकाळी बस नियोजित वेळेत आगारातून बाहेर पडत नाहीत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चा दणका; प्रशासन जागे