पालघर : दोन वर्षांपासून कोरोनाच्या माऱ्याने घरात कोंडलेल्या नागरिकांनी या वर्षी थर्टीफर्स्ट जल्लोषात साजरा करण्याचे मनसुबे आखले होते, मात्र ओमायक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने काढलेल्या परिपत्रकामुळे हे मनसुबे धुळीस मिळतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व रिसॉर्ट जवळपास फुल्ल असताना रात्री समुद्रकिनारा, पर्यटनस्थळांवर पोलीस दल डिजिटल कॅमेऱ्याने नजर ठेवणार असल्याने फुल टू धम्मालच्या अपेक्षेने पालघरमध्ये आलेल्या पर्यटकांचा पुरता हिरमोड होणार आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावाचे पडसाद राज्यभर पसरल्याने दुसऱ्या लाटेत कोरोनाने लोकांना घराबाहेरही पडू दिले नव्हते. ऑनलाइनच्या फटकाऱ्याने अख्खे कुटुंब घरात कोंडून राहत असताना लाॅकडाऊन शिथिल झाल्याने थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी तरुणांच्या ग्रुपसह, अनेक कुटुंबांनी थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट बुक केली होती. अचानक ओमायक्रॉनने जिल्ह्यात शिरकाव केल्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाने पर्यटकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस दल सज्ज ठेवले आहे.
ओमायक्रॉनच्या वाढत्या संख्येमुळे ३१ डिसेंबर या सरत्या वर्षाला निरोप देताना १ जानेवारी या नव्या वर्षांचे स्वागतासाठी मोठी गर्दी जमू शकत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या अधिपत्याखाली एक अप्पर अधीक्षक, ४ पोलीस उपअधीक्षक, ४३ पोलीस अधिकारी व ५४३ पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात ८५ ठिकाणी नाकाबंदी व फिक्स पॉईंट नेमले असून सर्व १६ पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस गस्त व हॉटेल, लॉजेस, सभागृह, पर्यटन स्थळे त्यांची तपासणी करणे तसेच अवैध दारू, अमली पदार्थ, गुटका यांच्यावर कारवाई करण्याकरता वेगवेगळे पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे रिसॉर्ट आणि हॉटेल मालकांचे धाबे दणाणले असून या परिपत्रकाच्या परिणाम होत पर्यटकांवर गुन्हे दाखल झाल्यास त्याचा मोठा परिणाम इथल्या पर्यटन व्यवसायावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
...तर होणार कारवाईजुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणा साजरे करावे आणि राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येणे यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पाचपेक्षा अधिक इसम एकत्र जमल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले आहे.