मीरा भाईंदर - सर्वात आधी शहरात शांतता राखणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जे काही घडले त्यावर आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करू. शहरात शांतता राहावी यासाठी आमचे प्रयत्न आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असं आवाहन मीरा भाईंदरचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी केले आहे.
अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक म्हणाले की, याआधी कधीही मीरा भाईंदर शहरात कायदा सुव्यवस्था बिघडली नव्हती. जे कुणी या घटनेत सहभागी आहेत अशा लोकांवर आम्ही नक्कीच कारवाई करू. सध्या वातावरण शांत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जर वातावरण शांत राहिले तर आम्हाला तपासात पुढे जाता येईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. नयानगर भागात एक रॅली निघाली होती. त्यातून काही वाद झाला आणि तो वाढत गेला त्यातून हा प्रकार घडला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच सोशल मीडियात ज्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यातील शक्य तितक्या आमच्या विभागाकडून डिलीट करण्यात येत आहे. काही व्हिडिओ मॉर्फ करून टाकले जातायेत. सोशल मीडियातून व्हिडिओ टाकले जातात, पण ग्राऊंडवर परिस्थिती हाताळणं कठीण जाते. त्यामुळे अनावश्यक पोस्ट व्हायरल करणे नागरिकांनी टाळावे. वातावरण बिघडणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. वातावरण शांत झाल्यानंतर पुरावे जमा करू असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं.
दरम्यान, मीरा भाईंदरमधील नयानगर भागात रात्री घडलेल्या संपूर्ण प्रकाराची कालच मी माहिती घेतली. सोमवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत मी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्य आरोपींची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कुणी बिघडवण्याचे प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही अशी माहिती फडणवीसांनी ट्विट केली होती.