ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका करणाऱ्या पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे चर्चेत आली आहे. केतकी चितळेच्या पोस्टचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी समाचार घेतला आहे. तर, कळवा पोलिस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आता, ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे. याबाबत, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली. केतकी चितळे सायंकाळी 4.30 वाजल्यापासून कळंबोली पोलिसांच्या ताब्यात असुन कळंबोली पोलीस चितळे यांना ठाणे पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी केतकी चितळेवर जोरदार हल्लाबोल केला. सोशल मीडियातून केतकी चितळेला ट्रोलही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केतकीच्या पोस्टवर सडकून टीका केली आहे. या लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही, अशा शब्दांत राज यांनी केतकीच्या पोस्टवर भाष्य केलं आहे. एक पत्रक ट्विट करत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
केतकी चितळेला ताब्यात घेतल्याबद्दल ठाणे पोलिसांचे व नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन आभार, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. अभिनेत्री केतकी चितळे हीनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक स्तरांतून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील यावर भाष्य केलं. “अशा गोष्टींमुळे सर्व स्तरांमध्ये चीड निर्माण होते. समाजात वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्यांमध्ये चिड निर्माण होते. जे आमच्या भगिनीनं लिहिलंय ते वाचवतही नाही. त्यांना कदाचित माहित नसेल शरद पवार यांचे तीन ऑपरेशन झाले आहेत. त्यातून ते बाहेर आलेत. अशा परिस्थितीतही ते गावखेड्यात शेतात जातात, सभा घेतात. ते देखील ८३ व्या वर्षी. त्यांच्या पत्नीही वाचत असतील ना या सर्व गोष्टी, मुलगीही पाहत असेल. त्यांना हृदय नाही का, आपलं असं काहीच नाही का?,” असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. अभिनेत्री केतकी चितळे हीच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टवर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे प्रकरण?
केतकी चितळेनं शरद पवार यांच्याबाबत आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये केतकीनं शरद पवार यांच्या आजारावरून टीका केली होती. तिनं आपल्या फेसबुकवर शेअर केलेल्या कवितेच्या खाली तिनं अॅडव्होकेट नितीन भावे असं नावंही दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसंच अनेकांनी तिच्या या पोस्टवर संतापही व्यक्त केला आहे. दरम्यान, यावरून यानंतर तिच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.