ठाणे : अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरुद्ध दाखल असलेल्या नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या जामीन अर्जाची सुनावणी लांबणीवर पडली. ठाण्याचे सत्र न्यायाधीश आशुतोष भागवत यांनी १६ जूनपर्यंत निर्णय राखून ठेवत असल्याचे मंगळवारी जाहीर केले.
रबाळे पोलीस ठाण्यात दाखल ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात सहायक पोलीस आयुक्तांसमोर सप्टेंबर २०२१ मध्येच केतकीचा जबाब पोलिसांनी नोंदविला. या प्रकरणात १९ मे २०२२ राेजी तिला ठाणे न्यायालयातून रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची पोलीस कोठडी २५ मे रोजी संपली. त्यानंतर ३० मे रोजी नवी मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल केले. तिचा जबाब पूर्वी नोंदविला गेल्यानंतर डिसेंबर २०२१ आणि फेब्रुवारी २०२२ अशी दोनवेळा सहायक पोलीस आयुक्तांनी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी मागितली होती.
याचाच अर्थ हा तपास पूर्ण झाला होता. तरीही तिला अनावश्य अटक केल्याचा युक्तिवाद केतकीच्या वतीने ॲड. योगेश देशपांडे यांनी मंगळवारी ठाणे न्यायालयात केला. तर हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून केतकीने तो वारंवार केल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला.