ठाणे:
अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात रबाळे पोलिसांच्या ताब्यात असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने केतकीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याने तिची रवानगी पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात झाली.
केतकी हिच्याविरुद्ध कोरोनाच्या कालावधीत २०२० मध्ये अँट्रॉसिटीचा गुन्हा नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आठ महिन्यांपूर्वी तिने ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. हा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्याच प्रकरणात रबाळे पोलिसांनी केतकीला १९ मे रोजी ठाणे न्यायालयातून ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्यात केतकीच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिला मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिला ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तिची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. दरम्यान, केतकीने रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होऊ शकते, असे केतकीच्या वकिलांनी सांगितले. यापूर्वी केतकीने कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला असून त्यावर देखील गुरुवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केतकीने केलेली पोस्ट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रिट्विट केली होती. मग केतकीला एक न्याय आणि आव्हाड यांना दुसरा न्याय का, असा सवाल केतकीचे वकील योगेश देशपांडे यांनी केला.