- राजू ओढेठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सायबरतज्ज्ञाने यवतमाळ पोलिसांच्या संगणक प्रणालीमध्ये कीलॉगर नावाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले होते. या सॉफ्टवेअरमुळे आरोपीस यवतमाळ पोलिसांच्या संगणकातील इत्थंभूत माहिती मिळत होती. पोलिसांची अतिगोपनीय माहितीही यामुळे सुरक्षित राहिलेली नाही.कुणाच्याही मोबाइल नंबरचा सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून, तो १० ते १२ हजार रुपयांमध्ये विकणाºया टोळीचा पर्दाफाश गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ने गत महिन्यात केला. या प्रकरणी देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित आणि काही खासगी गुप्तहेरांसह १० आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये यवतमाळ येथील अजिंक्य नागरगोजेचाही समावेश आहे. त्याची आणि सहआरोपी जसप्रीतसिंग मारवाह यांची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कोठडी २० फेब्रुवारीपर्यंत वाढवली.अजिंक्य नागरगोजे हा सायबरतज्ज्ञ असून, यवतमाळ पोलिसांनी त्याला पोलीस दलाची वेबसाइट बनवण्याचे काम दिले होते. त्यानिमित्ताने पोलिसांची संगणकीय प्रणाली हाताळण्याची संधी अजिंक्यला मिळाली. त्या वेळी त्याने पोलिसांच्या संगणकामध्ये कीलॉगर नावाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले. कीलॉगर हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर स्वरूपातही उपलब्ध असते. ते ज्या संगणकामध्ये इन्स्टॉल केले, त्या संगणकावर केल्या जाणाºया प्रत्येक कामाची माहिती रेकॉर्ड होते. ही माहिती सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणाºयास मिळते. सॉफ्टवेअरमुळेच अजिंक्यला यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकांचा ई-मेल आयडी, पासवर्ड कळू शकला. त्याचा दुरुपयोग अजिंक्यने लोकांच्या मोबाइल नंबर्सचे सीडीआर काढण्यासाठी केला. अजिंक्यने पोलिसांचा विश्वासघात केला असून, हे घातक असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले. पोलिसांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली.‘कीलॉगर’मुळे अजिंक्य नागरगोजेला यवतमाळ पोलिसांच्या संगणकीय प्रणालीतील संपूर्ण माहिती मिळत होती. त्याने पोलीस दलातील गोपनीय माहितीही मिळवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.असा करायचाई-मेलचा वापरआरोपी अजिंक्य नागरगोजेने कीलॉगर सॉफ्टवेअरच्या मदतीने यवतमाळ पोलीस अधीक्षकांचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड मिळवला होता. मोबाइल नंबर्सचे सीडीआर काढण्यासाठी त्याने याच ई-मेलचा वापर केला. संबंधित मोबाइल कंपनीला तो सकाळी किंवा सायंकाळी ६ वाजल्यानंतर सीडीआरकरिता ई-मेल पाठवायचा. दिवसाच्या वेळी या ई-मेलचा यवतमाळ पोलिसांकडून कार्यालयीन वापर व्हायचा. त्यामुळे खबरदारी म्हणून तो कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त ई-मेलचा वापर करायचा, अशी माहिती तपासात उघडकीस आली.
पोलिसांच्या संगणकात आरोपीचे ‘कीलॉगर’; अतिगोपनीय माहिती असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:57 AM