कल्याण : डोंबिवलीचे भाजपा आमदार व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना राज्य सरकारने दिलेल्या सात कोटींच्या विशेष निधीचे पत्र गुरुवारी केडीएमसीच्या महासभेच्या पटलावर माहितीसाठी ठेवण्यात आल्याने शिवसेना व भाजपा सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे सभेत काही वेळेसाठी गोंधळाचे वातावरण तयार झाले.
चव्हाण यांच्याप्रमाणे अन्य आमदारांना मिळालेल्या सात कोटींच्या विशेष निधीचे स्पष्टीकरण महासभेत प्रशासनाने का दिले नाही, या मुद्यावरून शिवसेना सदस्य दीपेश म्हात्रे व भाजपा गटनेते वरुण पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पाटील यांनी हरकत घेतल्याने त्यावर शिवसेना सदस्य रमेश म्हात्रे, मोहन उगले, सुधीर बासरे यांनी जोरदार हरकत घेतली. राज्यमंत्री केवळ डोंबिवलीचे नाहीत, तर संपूर्ण राज्याचे व कल्याण-डोंबिवली महापालिकेचेही आहेत. महापालिका हद्दीत शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर, भाजपा आमदार नरेंद्र पवार आणि गणपत गायकवाड यांनाही विशेष निधी मिळाला आहे. राज्य सरकारने प्रत्येक आमदाराला सात कोटी मंजूर केले आहेत. हा निधी संबंधित आमदाराने सुचवलेल्या प्रभागात खर्च केला जाणार आहे. त्यातून भरीव विकासकामे करणे अपेक्षित आहे. केवळ चव्हाण यांच्या निधीचा उल्लेख करून प्रशासन जाणीवपूर्वक भेदभाव करत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.यावेळी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी राज्यमंत्र्यांना दिलेल्या विशेष निधीविषयी टिप्पणी केली. त्याला भाजपा सदस्य राहुल दामले यांनी हरकत घेतली. हळबे यांच्या प्रभागात जास्त विकासकामे झाली आहेत, असे ते म्हणाले. त्यामुळे संतप्त झालेल्या हळबे यांनी चव्हाण यांच्या निधीतून दामले यांच्या परिसराभोवती विकासकामे घेतल्याचा आरोप केला. हा आरोप खोडून काढत दामले यांनी आपण स्थायी समितीच्या सभापतीपदी असताना प्रत्येक नगरसेवकाला भरीव विकासकामे करता यावीत, यासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. भाजपा कधीही भेदभावाचे राजकारण करत नाही. त्यामुळे हळबे यांचा आरोप निराधार असल्याचे दामले यांनी स्पष्ट केले.
केडीएमसी हद्दीत चार आमदार असून त्यांना एकूण २८ कोटी मिळाले आहेत. अन्य आमदारांची विशेष निधीची पत्रे थेट त्यांच्याकडे देण्यात आली. तसेच ती पत्रे आयुक्तांकडे थेट गेली. केवळ चव्हाण यांचे पत्र सभेच्या पटलावर ठेवल्याने सदस्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाल्याचे सदस्य विश्वनाथ राणे म्हणाले.‘त्या’ वारसांना नियुक्तीपत्रेच्कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील विहीर दुर्घटनेत महापालिकेच्या अग्निशमन दलातील दोन जवानांचा मृत्यू झाला होता. या जवानांच्या वारसांना नियुक्तीपत्रे महासभेत आयुक्त गोविंद बोडके व महापौर विनीता राणे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सर्व गटनेत्यांसह विरोधी पक्षनेत्यांना पाचारण केले होते.च्महापालिकेने तातडीने वारसांना न्याय दिल्याने शिवसेना सदस्य रमेश म्हात्रे यांनी प्रशासन, महापौरांचे अभिनंदन करत आभार मानले. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनांमध्ये आपला कामगार दगावला जाता कामा नये, अशी काळजी प्रशासनाने घ्यावी. आपली यंत्रणा सक्षम करावी, याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.