कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहत आहे तर बदलापूरमध्ये मेट्रोची कारशेड उभारण्यासाठी नियोजन सुरू आहे. मुळात या शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ती सुधारावी असे प्रशासन आणि नेत्यांना वाटत नाही. सर्वसामान्य जीव मुठीत घेऊन या रस्त्यांवरून प्रवास करत आहेत. त्यामुळे आधी आहेत ते रस्ते सुधारा मग आधुनिकतेच्या गप्पा मारा.भिवंडी-कल्याण-शीळ हा सुमारे २१ किलोमीटरचा मार्ग रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला आहे. त्याचा काही भाग हा कल्याण शहरातून जातो. कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, पत्रीपूल, सूचकनाका, नेतीवली टेकडी, मानपाडा याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या प्रमुख रस्त्यांसह महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण-शीळ मार्गावरही खड्डे पडले आहेत. या मोठया रस्त्यांसह शहरातील अंतर्गत रस्तेही यातून सुटलेले नाहीत. खड्यांच्या पार्श्वभूमीवर केली जाणारी डांबराची डागडुजीही कूचकामी ठरली आहे. खड्डे अक्षरश: खडी टाकून भरले आहेत. त्यामुळे या खडीचा त्रास वाहनचालकांना होतो. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पत्रीपूल ते दुर्गाडी चौक या रत्यावर गेल्यावर्षी दोघांचे बळी गेले आहेत.शिवाजी चौक परिसरात असलेल्या रस्त्याच्या असमतोलपणामुळे एका सात वर्षीय मुलाचाही नाहक बळी गेला होता. कल्याण पूर्वेतील पूना लिंक रोडवरील रस्त्यांची अवस्थाही म्हणावी तशी चांगली नाही. या रस्त्यावरील काही रस्ते हे सिमेंट काँक्रिटचे आहेत तर काही डांबरी. या रस्त्यावरील चौकाचौकात पेव्हरब्लॉक टाकण्यात आल्याने पहिल्याच पावसात या पेव्हरब्लॉकमध्ये पाणी साठल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करून इच्छित स्थळी जावे लागते. शाळेच्या ठिकाणी विद्यार्थी, पालकांबरोबरच रिक्षाचालक आणि वाहनांची गर्दी शाळा सुटताना आणि भरताना हमखास पाहयला मिळते. खराब रस्ते हे कोंडीचे प्रमुख कारण आहे.कल्याणहून शीळफाटयाच्या दिशेने जाताना वाहनचालकांना सर्वात पहिला सामना करावा लागतो तो म्हणजे पत्रीपूलाचा. जुना झालेला पत्रीपूल नोव्हेंबर महिन्यात पाडण्यात आल्याने एकाच पुलावरून होणाºया वाहतुकीमुळे याठिकाणी कोंडी नेहमीचीच झाली आहे. तास-दीड तासाने पत्रीपूल ओलांडून पुढे गेल्यावर लागतो तो सूचक नाका. या नाक्याजवळील रस्ता काही महिन्यांपूर्वी खोदण्यात आला होता. रस्ता खोदल्यानंतर तयार झालेल्या खड्यातच रिक्षाचालक आपल्या रिक्षा उभ्या करत होते.कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेने जाताना शीळफाटयापर्यंतचा प्रवास हा वाहतुकीसाठी त्रासदायकच ठरत आहे. या मार्गाजवळ वाढणाºया बांधकामाबरोबरच रस्त्याचे तसेच गटारांचे अर्धवट राहिलेले बांधकाम, रस्त्याच्याकडेला ठेवण्यात आलेले मोठे पाइप यामुळे येथील कोंडी वाढतच गेली आहे. या मार्गावर इतर वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतूक अधिक प्रमाणात होते. खरेतर हा वर्दळीचा रस्ता आहे. याच रस्त्यावर मोठी गृहसंकुले, अनेक शाळा असल्याने स्कूलबसची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे ठरविक वेळेत या रस्त्यावर हमखास कोंडी होते. याच रस्त्यावर तसेच आतील बाजूस कारखाने असल्याने मालवाहतूक वाहनेही सतत ये-जा करत असतात.डांबरी रस्त्यांची पातळी समान न राहिल्याने हे चढउतार वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांच्या जीवावर उठले आहेत. तसेच, जागोजागी टाकण्यात आलेले पेव्हरब्लॉक उखडले गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, या रस्त्यावरून जाणाºया वाहनचालकांना कसरत करतच आपली वाहन चालवावी लागतात.पालिकेला अजून किती बळी हवेत?शहरातून जाणाºया कल्याण-मुरबाड व कल्याण -बदलापूर राज्य महामार्गाची दुरवस्था झाली आहे. दोन्ही रस्त्यांची पुनर्बांधणी सुरू असताना शहरात बे्रक लागल्यासारखी स्थिती आहे. त्यापैकी मुरबाड रस्त्याचे काम पूर्ण होत आले असून कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम गेल्या चार वर्षापासून ठप्प आहे. खड्डयांमुळे अनेकांचे बळी गेले असून महापालिका अजून किती बळी घेणार? असा प्रश्न विचारला जात आहे. उल्हासनगरमधून जाणाºया कल्याण-बदलापूर रस्ता पुनर्बांधणीचे काम एमएमआरडीएने चार वर्षापूर्वी सुरू केले. मात्र शहरातून जाणारा रस्ता अरूंद असल्याने १०० फूट रस्ता रूंदीकरणाचे आदेश न्यायालयाकडून महापालिकेला देण्यात आले.तत्कालिन पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी रूंदीकरण फक्त १५ दिवसात केले. रूंदीकरणात एक हजारापेक्षा जास्त दुकानदारांसह घरे बाधित झाली. अशंत: बाधित व्यापाºयांना दुरूस्तीची तोंडी परवानगी दिली. तर पूर्णत: बाधित व्यापाºयांना इंदिरा गांधी भाजी मंडई येथील जागी व्यापारी गाळे देण्याचा ठराव मंजूर केला. पूर्णत: बाधित व्यापाºयांपैकी काही व्यापाºयांनी प्रथम पर्यायी जागेची मागणी पालिकेकडे करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. हा प्रकार न्यायप्रविष्ट असल्याने रस्त्याचे रूंदीकरण होऊनही पुनर्बांधणी रखडली आहे. रस्त्याच्या खड्डयाने अनेकांचे बळी घेतले असून महापालिकेला जाग कधी येणार? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.रस्ता दुरूस्तीसाठी २२ कोटींचा निधी गेल्या चार वर्षापासून धूळखात पडला आहे.रेयॉन सेंच्युरी कंपनीसमोरील कल्याण ते मुरबाड रस्त्याची दुरवस्था झाली होती. एमएमआरडीएने रस्त्याची दुरूस्ती सुरू केली आहे. दुरूस्ती अंतिम टप्यात असली तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे काम अद्यापही अर्धवट आहे. पावसाळयात चिखल व पाणी साचून अपघात होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे काम एमएमआरडीएने केल्यास वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघून अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. शहरातून जाणाºया दोन्ही राज्य महामार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असून रस्ता रूंदीकरणाने वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.कल्याण-बदलापूर रस्त्याला मुहूर्त सापडेनाअंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण-बदलापूर राज्य महामर्गाच्या उर्वरित कामासाठी निधी आणि त्या कामाचे आदेश मंजूर असतानाही त्याचे काम सुरू केलेले नाही. शहरातील या महत्वाच्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हीच परिस्थिती काटई नाका ते कर्जत या राज्य महामर्गाची झालेली आहे. अंबरनाथ मटका चौक ते फॉरेस्ट नाका या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. या रस्त्यावरील अतिक्रमण न हटल्याने तो रस्ता तसाच राहिला आहे. मात्र अतिक्रमण हटवल्यानंतर चार वर्ष उलटले तरी अजून त्या रस्त्याचे काम झालेले नाही. या रस्त्याच्या कामाचे आदेश असतानाही कंत्राटदाराने ते काम सुरू केलेले नाही. त्यामुळे फॉरेस्ट नाका परिसरात रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. इतकेच नव्हेतर रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यासाठी मोकळी ठेवलेली जागा ही दुचाकीस्वारांना धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी दुचाकीचे टायर अडकून अनेक अपघातही झालेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉक हे धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे ते पेव्हर बदलण्याची गरज आहे. अशीच अवस्था काटई नाका ते बदलापूर रस्त्याची झाली आहे. हा रस्ता डांबरी असल्याने अनेक ठिकाणी खचला आहे. अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. चिखलोली गावाजवळील रस्त्यावर खड्डे हे वाहनचालकांसाठी धोकादायक झाले आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी असलेले स्पीडब्रेकरही जीवघेणे ठरत आहेत. असलेल्या स्पीडब्रेकरला पांढरे पट्टे न मारल्याने वेगात येणारे वाहन या स्पीड ब्रेकरवर आदळून अपघात होतात. त्यात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून ती दूर करावी असे प्रशासनाला अजिबात वाटत नाही.
या रस्त्यावर सध्या दगडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे दगडावरूनच वाहनांची ये-जा सध्या सुरू आहे. थोडे पुढे गेल्यानंतर लागणारा टाटा पॉवर ते गोळवली या रस्त्यांची दुरवस्था कथन न केलेलीच बरी. या रस्त्यावर छोटेमोठे असे अनेक खड्डे ओलांडून वाहनचालकांना पुढच्या दिशेने जावे लागते. त्यातच रस्त्याच्याबाजूला असणारे फेरीवाले आणि अर्धवट असलेल्या गटारांचा सामना करत वाहनचालकांना पुढे जावे लागते. सकाळच्यावेळी पलावा येथील वसाहतीमधून शीळफाटयाच्या दिशेने जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहने बाहेर पडत असतात.यामुळे शिळफाट्याकडून कल्याण, बदलापूरच्या दिशेने येणारी तसेच शीळफाटयाच्या दिशेने जाणारी वाहने येथील चौकात अडकून पडतात. कल्याणहून ठाणे किंवा मुंबईला जाण्यासाठी उल्हास खाडीवरील दुर्गाडी पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, वाहनांच्या प्रचंड वाढलेल्या संख्येमुळे दुर्गामाता चौक परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ६ पदरी नवीन पूल बांधण्याचे एमएमआरडीएने निश्चित केले होते. त्यानुसार मार्च २०१६ मध्ये संबंधित कंत्राटदाराला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मार्च २०१८ पर्यंत हा पूल बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात गेल्या कित्येक महिन्यांपासून या पुलाचे काम संथगतीनेच सुरू आहे.खड्ड्यांमुळे झालेले अपघात2013- नामदेव मोरे यांचा पत्रीपूल येथील खड्ड्यांनी बळी घेतला.2016- कल्याण-श्रीमलंग रोडवरील खड्ड्यांमुळे प्राजक्ता फुलोरे या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा डंपरखाली आल्याने मृत्यू.2018- कल्याण पश्चिमेतील शिवाजी महाराज चौकातील असमतोलपणामुळे मनीषा भोईर या महिलेचा आणि आरोह आतराळे या सातवर्षीय मुलाचा नाहक बळी गेला.द्वारली परिसरात खड्ड्यांमुळे अण्णा नावाच्या व्यक्तीचा मृत्यू.कल्पेश जाधव या तरूणाचा बळी गेला.