शहापूर तालुक्यातील जंगल भागातील वणवा सत्रात शेकडो हेक्टर क्षेत्रातील वनसंपदेत आदिवासींना रोजगार देणाऱ्या रानमेव्यासह औषधी वनस्पती जळून खाक झाल्याने रोजगाराच्या गंभीर समस्येने ग्रासलेला आदिवासी चिंता व्यक्त करतात.
तालुक्यातील टाकीपठार ,साकडंबाव, वाशाळा, डोळखांब, खरपत, नामपाडा,चोंढा,आजोबा पर्वत, शिदपाडा , विहिगाव या पठारावरील व डोंगर - दऱ्याखोऱ्यात वास्तव्यास असणारे ठाकूर,कातकरी,मल्हार कोळी,महादेव कोळी व इतर मागास वर्गीय आदिवासी लोक मार्च,एप्रिल,मे या तीन महिन्यात जंगलात मिळणाऱ्या करमाळा, दुर्मिळ चविची फळे,काटेरी बिनकाटेरी झुडपावर मिळणारी फळे, बोरे,हिरवी काळी करवंदे,चिकन चोपडा,आठुरणे, बेलफळे, कवटा, आसाने,तोरणे,तेंबुरणे, आवळे,भोकरे,उंबर,चिंच,बिंदुकली, कैऱ्या,काजू,आलिव,फणस, गुंजपाला, हुमणा व इतर विविध प्रकारच्या रानमेव्यासह औषधी वनस्पती रोजगाराच्या उद्देशाने तप्त उन्हात फिरून गोळा करतात व पळसाच्या हिरव्यागार पानाच्या डोम्यात (द्रोण) हा रानमेवा भरून व औषधी वनस्पती शहापूर, शेणवा , किन्हवली,कसारा, आटगाव मुरबाड,आसनगाव येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन बसतात व प्रती द्रोण किंवा वाटा दहा ते पंधरा रुपये दराने विक्री करून प्रतिदिन शे - दोनशे रुपये कमवतात यातूनच मिळणाऱ्या रोजगारातून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात परंतु यावर्षी तालुक्यातील 80 टक्के जंगल भागात वणवा लागल्याने वणव्यात वेली, झाडा झुडपावरील दुर्मिळ रानमेवा व औषधी वनस्पती जळून खाक झाल्याने बेरोजगारीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत असल्याने आदिवासी चिंता व्यक्त करतात .