ठाणे : अ.भा. मराठी नाट्यपरिषदेचा घटनादुरुस्तीचा मसुदा मंजूर करण्यासाठी रविवारी विशेष सर्वसाधारण सभा झाली. वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रचंड खल झाल्याने एकूण ७५ पानांपैकी दिवसभर केवळ १६-१७ पानांवरच चर्चा होऊ शकली. पुढच्या मुद्द्यांसाठी येत्या २४ एप्रिलला ही सभा पुन्हा भरणार आहे.नाट्यपरिषदेने घटनेत बदल करण्यासाठी गुरुनाथ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सहासदस्यीय घटनादुरुस्ती समिती नेमली होती. या समितीने बनवलेला सुधारित घटनेचा मसुदा मंजूर करण्यासाठी रविवारी नाट्यपरिषदेचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील यशवंत नाट्य संकुलात सर्वसाधारण सभा बोलावली होती. घटनादुरुस्ती समितीचे प्रमुख दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सर्वाधिक खल नियामक मंडळातील सदस्यसंख्येवर झाला. दुरुस्तीमध्ये नियामक मंडळातील एकूण सदस्य संख्या ४५ वरून ६९ केली असून त्यात सभासदांतून निवडून आलेले सदस्य ६०, घटक संस्थांचे सदस्य ८ आणि नव्याने निवडून आलेले नाट्यसंमेलनाध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य अशा ६९ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात निवडून येणाऱ्या सभासदांमध्ये प्रत्येक शाखेला प्रतिनिधित्व देण्यात यावे, मुंबईतील सदस्यसंख्या यावरून बरेच मुद्दे चर्चेत आले. इतर शाखांचा न्याय मुंबईसाठीही लावावा, असा मुद्दा उपस्थित करून त्यावर बराच खल झाला. तो निर्णय राखून ठेवत पुढील सभा २४ एप्रिलला घेण्याचे ठरले. तत्पूर्वी दोन वर्षे सलग नियामक मंडळावर काम केलेल्या सदस्याला पुढील एक सत्रासाठी निवडणूक लढवता येणार नाही, ही दुरुस्ती रद्द करण्यात आली. सदस्याची वयोमर्यादा ७५ असावी, ही दुरुस्ती कायम ठेवण्यात आली आहे.आजच्या सभेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, कोषाध्यक्ष लता नार्वेकर, घटनादुरुस्ती समितीचे सदस्य अॅड. देवेंद्र यादव, आनंद भोसले, नाथा चितळे यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)
घटनादुरुस्तीच्या सभेत ‘खल’नाट्य!
By admin | Published: March 21, 2016 3:16 AM