कल्याण : एकीकडे केडीएमसीच्या हद्दीतील रस्त्यांमध्ये पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ संबंधित यंत्रणेविरोधात राजकीय पक्षांकडून आंदोलने छेडली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या खंबाळपाडा मार्गावरही हेच चित्र असून, या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. २०१७च्या पावसाळ्यात या मार्गावर सुरू असलेल्या गटाराच्या कामानिमित्त खोदलेल्या खड्ड्यांत पडून एका व्यापाराचा मृत्यू झाला होता. सध्याचे खड्डे पाहता आणखीन बळी गेल्यानंतर संबंधित यंत्रणेला जाग येणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
टाटानाका ते घरडा सर्कल हा खंबाळपाडा मार्ग केडीएमसीच्या हद्दीत येत असला तरी या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला केमिकल कंपन्या तसेच बेकायदा थाटलेली मार्बलची दुकाने आहेत. या रस्त्यावर प्रदूषित पाण्याच्या प्रवाहाबरोबरच भोवताली पडलेल्या डेब्रिजच्या कचऱ्याने या मार्गाला एकप्रकारे अवकळा आली आहे. जलवाहिनीवर झालेली बेकायदा बांधकामे, याेग्य प्रकारे नालेसफाई न झाल्याने पावसाचे पाणी या मार्गावरील विकासनाका येथे तीन ते चार फुटांपर्यंत साचत होते. तेथे रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. त्याला लागून असलेल्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मध्यंतरी या रस्त्याची दुरुस्ती केली होती. मात्र, पावसाळा सुरू हाेताच पडलेल्या खड्ड्यांनी या कामाचा दर्जा दाखवून दिला आहे. विकासनाका, भोईरवाडी, सावित्रीबाई फुले कला मंदिरनजीकचा चौक या महत्त्वाच्या ठिकाणांसह या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. माेठमाेठे खड्डे असल्याने या मार्गावरून वाहन चालविणे चालकांसाठी डाेकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कल्याण कार्यालयातील दूरध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
--------------------------------
खड्ड्यातील पाण्याने आंघोळ करू
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सातत्याने या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. ते काम निकृष्ट झाल्याचे आता पडलेल्या खड्ड्यांनी उघड केले आहे. मोठमोठ्या खड्ड्यांतून वाहन चालविताना जीव मुठीत घेऊनच तेथून मार्गस्थ व्हावे लागते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. वेळीच हे खड्डे न बुजवल्यास यंत्रणेच्या निषेधार्थ खड्ड्यांत साठलेल्या पाण्याने आंघोळ करू, असे मत रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.