ठाणे : येत्या शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेच्या रात्री खंडग्रास चंद्रग्रहण होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. पुन्हा कोजागरीच्या रात्री दिसणारे खग्रास चंद्रग्रहण १८ ऑक्टोबर २०३२ रोजी होणार असल्याचेही सोमण त्यांनी सांगितले.
येत्या शनिवारी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की, २८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर १ वाजून ५ मिनिटानी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री १ वाजून ४४ मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. त्यावेळी ६ टक्के चंद्रबिंब ग्रासित दिसेल. चंद्रग्रहण उत्तररात्री २ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होईल. हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी सर्वांना पहाता येईल. हे चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, यूरोप आणि आफ्रिका या प्रदेशातून दिसेल. यापूर्वी २००४ मध्ये कोजागरीच्या रात्री चंद्रग्रहण भारतातून दिसले होते. पुढच्यावर्षी सन २०२४ मध्ये एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही. यानंतर ७ सप्टेंबर २०२५ रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.