कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘खेलो इंडिया’ या संकल्पनेमुळे मैदानी खेळांचे महत्त्व वाढले असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.शहराच्या पूर्व भागातील दादासाहेब गायकवाड मैदानात महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने कै. अनिल कर्पे स्मृतिप्रीत्यर्थ भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले आहे. नव तरुण मंडळ या स्पर्धेचे आयोजक आहे. या मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून कबड्डी स्पर्धेला विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी भेट दिली. याप्रसंगी फडणवीस यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. याप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, आयुक्त गोविंद बोडके, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, माजी नगरसेवक सचिन पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी कबड्डीपटंूशी हस्तांदोलन केले. तसेच एका सामन्यासाठी त्यांनी नाणेफेक करून सामन्याची सुरुवात केली. काही वेळ त्यांनी सामना पाहिला. कबड्डी हा आपल्या मातीतील खेळ असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. काही संघ हरले असले तरी त्यांनी पुन्हा नव्या दमाने तयारी करावी. पुढच्या काळात त्यांना यश नक्कीच मिळणार, असे आवाहन फडणवीस यांनी सर्व क्रीडापटूंना केले. या स्पर्धेत ३३ संघ उतरले असून आयोजक आमदार गायकवाड यांच्या उत्कृष्ट आयोजनाविषयी फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले.
‘खेलो इंडिया’मुळे मैदानी खेळांचे महत्त्व वाढले - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:36 AM