सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर भाजपातील मराठी चेहरा व विरोधी पक्षनेते राजेश वानखडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव ठाकरे गटात रविवारी प्रवेश घेतला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वानखडे यांना शिवबंधन बांधले असून वानखडे हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राहणार असल्याने आमदार बालाजी किणीकर यांचे टेन्शन वाढले आहे.
उल्हासनगर भाजपातील मराठी चेहरा असलेले राजेश वानखडे यांचा शहरात दबदबा असून महापालिकेत भाजपचे विरोधी पक्षनेते पदी होते. तसेच शहर कार्यकारिणीत त्यांनी महासचिव पद भूषविले आहे. सन-२०१४ च्या अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत एकीकृत शिवसेना व भाजप एकमेकासमोर उभे ठाकले होते. तेंव्हा शिवसेनेच्या बालाजी किणीकर यांच्या तोंडाला राजेश वानखडे यांनी फेस आणला होता.
आमदार किणीकर यांचा अवघ्या २ हजार मतांनी निसटता विजय झाला होता. किणीकर यांना ४७ हजार तर राजेश वानखडे यांना तब्बल ४५ हजार मतदान झाले होते. येणाऱ्या अंबरनाथ विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून राजेश वानखडे यांच्याकडे बघितले जात आहे. वानखडे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटात आणण्यासाठी कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे व जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.
राजेश वानखडे यांच्या प्रवेशने शहर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढली असून लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप, शिवसेना शिंदे गटासह इतर पक्षातील नेते व पदाधिकारी शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याचे संकेत यावेळी जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी दिले. वानखडे यांच्या प्रवेशाने अंबरनाथ, कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा व कल्याण लोकसभेवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. वानखडे हे शहरातील नामांकित तक्षशिला शिक्षण संस्थेचे महासचिव असून आंबेडकरी समाजात त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे.
आमदार किणीकरचे टेन्शन वाढले
सन-२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार बालाजी किणीकर व राजेश वानखडे यांची लढत रंगली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजप नेते म्हणून वानखडे यांनी किणीकर यांच्यासाठी नागरिकांकडे मते मागितली होते. ठाकरे गटातील प्रवेशाने संभाव्य उमेदवार राहणार म्हणून वानखडे यांच्याकडे बघितले जात आहे. त्यामुळे किणीकर यांचे टेंशन वाढले असून कल्याण लोकसभेवरही त्याचा परिणाम होणार आहे.