ठाणे : जन्मानंतर अवघ्या चार तासांमध्ये अपहरण झालेल्या बाळाचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी अपहरण करणा-या महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली असून तिच्याकडून या बाळासह आणखी सहा मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिली.पोलिसांनी बाळाचा छडा लावल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच घेतलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत पांडेय यांनी ही माहिती दिली. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि ठाण्याचे उपायुक्त डी.एस. स्वामी आदी उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मनसेनेही याच पार्श्वभूमीवर रु ग्णालयात रविवारी जोरदार आंदोलन केले. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांबरोबर समांतर तपासाचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकातील निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे, संदीप बागुल, समीर अहिरराव, श्रीशैल चिवडशेट्टी, उपनिरीक्षक राजश्री शिंदे, एस.बी. खुस्पे, अशोक माने आणि हवालदार सुभाष मोरे आदींनी डोंबिवलीच्या पिसवली गावातील आडवली, नेताजीनगर भागातून गुडिया राजभर (३५) आणि तिचा पती सोनू राजभर (४०) या दोघांना सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्यापाठोपाठ तिचा साथीदार विजय श्रीवास्तव ऊर्फ कुबड्या (५५) यालाही त्याच सुमारास अटक केली. चोरीतील बाळासह या महिलेच्या घरातून आणखी अनुक्रमे दोन महिने, साडे पाच वर्ष, सात वर्ष, नऊ वर्ष आणि १२ वर्षाच्या पाच मुली तसेच चार वर्षांचा एक मुलगा अशी सहा मुले मिळाल्याचेही पोलिसांनी सांगितले. ही सर्व मुले स्वत:चीच असल्याचा दावा या महिलेने केला असला तरी त्यांची डीएनए तपासणी करण्यात येणार असल्याचे निरीक्षक नितिन ठाकरे यांनी सांगितले.
त्यात ही लाल साडीतील महिला स्पष्ट दिसली. त्यानंतर, ती ठाणे रेल्वे स्थानकातून सीएसटीच्या लोकलमध्ये बसल्याचे सीसीटीव्हीतील चित्रण मिळाले. त्यानंतर, ठाणे ते सीएसटी या प्रत्येक रेल्वेस्थानकातील तसेच बस आगारातील सीसीटीव्हींची पडताळणी पोलिसांनी केली. सीएसटीवरून ती डोंबिवलीत उतरल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे यांना आढळले. त्यानंतर, अनेक वेगवेगळ्या धाग्यादो-यांच्या आधारे पोलिसांनी कल्याण पूर्वमधील पिसवली गावातून गुडिया, तिचा पती सोनू आणि त्यांचा शेजारी तसेच अपहरण प्रकरणातील तिचा साथीदार विजय अशा तिघांना पोलिसांनी अटक केली.आधी आंदोलन, मग सत्कारजिल्हा रुग्णालयातून बाळ हरवल्यानंतर मनसेने रविवारी जोरदार आंदोलन केले होते. आज पुन्हा काही नगरसेवक आंदोलनाच्या तयारीत होते. इतर लोकप्रतिनिधींनीही या बाळाचा शोध लागलाच पाहिजे, असा दबाव पोलिसांवर आणला होता. सोमवारी दुपारीही आंदोलनाच्या तयारीत काही राजकीय कार्यकर्ते होते. तितक्यात रुग्णालयात पोलिसांच्या गाड्या आल्या. तेव्हा बाळाचा शोध लागल्याचे समजल्यानंतर सर्वप्रथम ठाण्याचे शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक तसेच अनेक नगरसेवकांनीही सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय, निरीक्षक नितीन ठाकरे आणि उपायुक्त अभिषेक त्रिमुखे या अधिका-यांचा रुग्णालयाच्या आवारातच सत्कार केला.