डोंबिवली : पूर्वेकडील ९० फूट रोडवर एका तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्याचा नशाबाजाने केलेला प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे रविवारी रात्री हाणून पाडण्यात आला. मात्र रामनगर पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न करणा-या नशाबाजालाच ‘व्हिआयपी ट्रिटमेंट’ देत फ्राईड राईस खाऊ घातला. तसेच नागरिकांना त्याच्याविरोधात तक्रार न देण्याचा अजब सल्ला दिल्याने तेही चक्रावून गेले. अखेरीस आग्रह धरल्यामुळे रात्री उशिरा पोलिसांनी नशाबाजाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.अभिषेक भगत हे रेल्वेत कामाला असून त्यांची नियुक्ती मध्य प्रदेशात केलेली आहे. त्यांचे कुटुंब डोंबिवलीत वास्तव्य करते. त्यांना तीन व सात वर्षांचे दोन मुलगे आहेत. रविवारी ते सुट्टीनिमित्त घरी आले होते. पत्नी व दोन मुलांसह ते रात्री घराबाहेर पडले होते. तेवढ्यात त्याच्या तीन वर्षाच्या मुलाला एका नशाबाजाने उचलून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. भगत यांनी आरडाओरडा केला आणि नशाबाज अपहरणकर्त्याचा पाठलाग केला. तेव्हा नशाबाजाने त्याच्याजवळ असलेल्या काठीने त्यांच्यावर प्रहार केला. नशाबाज गर्दच्या नशेत असल्याने त्याला धड पळता येत नव्हते. अखेरीस नागरिकाच्या मदतीने पकडून त्याला चांगलाच चोप देण्यात आला. भगत यांच्या मदतीला किरण हर्डीकर, त्यांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते दीपक मेहता हेही आले. मुलाला घेऊन भगत पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलीस एक तासानंतर नशाबाजाला घेऊन आले. भगत यांची मुले कंटाळून उपाशीच झोपली.तक्रारदार भगत यांच्याकडे घडल्या घटनेबाबत विचारपूस करण्याऐवजी पोलिसांनी नशाबाजाला फ्राईड राईस खाण्यास दिला. नशाबाजाने पोलिसांसमक्ष फिर्यादी भगत यांनी धमकावले. पण पोलिसांनी त्याला मज्जाव केला नाही. पोलिसांनी रात्री उशिरा नशाबाजाच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा नंबर भगत यांना दिला. पण नशाबाजाचे नाव सांगण्यासही नकार दिला. पोलिस गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करीत होते. तुम्ही सूज्ञ नागरिक असाल, तर तक्रार देऊ नका. सारखे जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात व नंतर न्यायालयात यावे लागेल, अशी भीती घालत पोलीस नागरिकांना तक्रार देण्यापासून परावृत्त करीत होेते. हा प्रकार धक्कादायक असल्याचे भगत व त्यांच्यासोबत गेलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर मुलाच्या अपहरणाचे हे प्रकरण मीडियाकडे नेऊ नका, असा धमकीवजा सल्ला पोलिसांनी भगत यांना दिला.याबाबत रामनगर पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी दावा केला की, भगत व अन्य लोकांनी पकडलेला कथित अपहरणकर्त्या आरोपी मनोरुग्ण आहे. त्यामुळे तो त्याचे नाव धड सांगू शकत नव्हता. पोलिसांच्या मते तो मनोरुग्ण असला तरी त्याने भगत यांना ‘पोलीस माझे काहीच वाकडे करु शकत नाही’, असा दम कसा भरला, असा प्रश्न फिर्यादीने केला आहे.काही दिवसांपूर्वी कल्याण खडकपाडा परिसरात एका नशाबाजाला मुलीचे अपहरण करताना नागरिकांनी पकडून दिले होते. त्याचीच पुनरावृत्ती डोंबिवलीत घडली. नागरीक गुन्हा रोखण्यासाठी स्वत:हून पुढे आले तर त्यांना पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नाही हेच उपरोक्त घटनेतून पुन्हा प्रत्ययास आले.>मुले चोरणाºया टोळीबाबत शहरात अफवांचे पीकडोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याण परिसरात मुले चोरणारी १५ ते २० जणांची टोळी असल्याची अफवा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालते आहे.त्यामुळे नशेबाजाने मुलाला पळवण्याचा केलेला प्रयत्न आणि पोलिसांनी चोर सोडून संन्याशालाच सुळावर चढवत दिलेला सल्ला सोशल मीडियावर गाजला आणि त्यातून पोलिसांच्या वृत्तीवर नेटिझन्सनी चांगलेच कोरडे ओढले.या अफवांंमुळे सध्या पालकही मुलांच्या येण्या-जाण्याच्या वेळेबाबत कमालीचे जागरूक झाले असून परस्परांना सतत अपडेट कळवत आहेत. मुलांना जरा जरी उशीर झाला तरी चिंतातूर होऊन परस्परांना कळवत आहेत.
अपहरणकर्त्यालाच मेजवानी, नशाबाज आरोपी मनोरुग्ण असल्याचा लावला जावईशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 3:18 AM