भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गावात २५ वर्षीय पीडित महिला कुटुंबासह राहते. १८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरकाम करण्यासाठी ती आपल्या सासूबरोबर गेली होती. मात्र, प्रकृती बरी नसल्याने ती घरी आली. त्यानंतर थोड्या वेळाने बरे वाटत असल्याने ती पुन्हा कामाला जायला निघाली असता रिक्षाचालक शारदाप्रसाद याने तिला रस्त्यातच गाठले. त्याने जबरदस्तीने रिक्षात बसवून तिचे अपहरण केले. पीडित महिलेची प्रकृती बरी नसल्याने ती चक्कर येऊन रिक्षात झोपली. काही वेळाने शुद्धीवर आली असता ती एका खोलीत विवस्त्र अवस्थेत होती. रिक्षाचालक नराधमाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला होता. या घटनेने पीडित महिला भयभीत झाली. तिने रिक्षाचालकास घरी जाऊ देण्याची विनवणी केली. परंतु, त्याने मारहाणीची धमकी देत तिला खोलीत कोंडून सायंकाळी कुठेतरी बाहेर गेला. त्यावेळी पीडितेने तिच्या पतीस मोबाइलवरून फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, फोनमध्ये बॅलन्स नसल्याने पतीशी संपर्क झाला नाही. काही वेळाने हा नराधम पुन्हा घटनास्थळी आला व तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांना पीडितेच्या आईचा फोन आला असता, त्यांनी पीडित महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. तिने पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लकी हॉटेलचे नाव घेताच फोन बंद झाला. याआधारे गायकवाड यांनी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे व शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांना संपर्क करून अपहरण झाल्याचा प्रकार सांगितला. पोलिसांनी तत्काळ आसनगाव येथील परिवार गार्डन हॉटेलसमोर नाकाबंदी केली. दरम्यान, नराधम रिक्षाचालक रिक्षाने पीडितेला खडवलीफाट्यावरील लकी हॉटेल येथे घेऊन आला. त्या ठिकाणी धाव घेऊन पोलिसांनी नराधमाला अटक केली. याप्रकरणी शारदाप्रसाद याच्यावर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पडघा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार आडगळे करत आहेत.
अपहरण करून विवाहितेवर रिक्षाचालकाचा बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:41 AM