ठाणे : दिव्यातील सुरेंद्र मिश्रा (२६) याच्या अपहरणप्रकरणी नारायण नागरगोजे या वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील भास्कर नारंगीकर (६७, रा. पाळपादेवी पाडा, मुलुंड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट -१ ने बुधवारी अटक केली. त्याला ४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.सुरेंद्रचे मुंबईच्या नाहूर रोड येथील एका चोवीसवर्षीय तरुणीवर प्रेम होते. या प्रेमसंबंधाला तिच्या वडिलांचा विरोध होता. त्यांचे लग्नही होणार होते. १९ जुलै रोजी तो दिव्यातच भाड्याने रूम घेण्यासाठी बाहेर पडला होता. परंतु, त्याचवेळी ठाण्याच्या तीनहातनाका येथून त्याचे अपहरण झाले. त्याला एका गाडीतून नेण्यात आले. नारंगीकर यांच्या घरातच त्याला मारहाणही झाली. त्यानंतर मात्र तो गायब झाला. याबाबत सुरुवातीला नौपाडा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. परंतु, त्याचा पयासीपूर (उत्तर प्रदेशातील) येथील भाऊ वीरेंद्र मिश्रा याने या संपूर्ण प्रकरणात संशय व्यक्त करून त्याचे अपहरण झाल्याची तक्रार २९ जुलै २०१८ नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. या प्रकरणात नागरगोजे या वकिलासह मुलीच्या नातेवाइकांचाही समावेश असल्याचा संशय त्याने व्यक्त केला. दरम्यान, नागरगोजे यांनी ठाणे न्यायालयातून या प्रकरणात गुरुवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मिळवला आहे. त्यांना चौकशीसाठी बोलवले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यातील अन्यही आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तरुणाच्या अपहरणप्रकरणी ठाण्याच्या वकिलासह चौघांविरुद्ध गुन्हा : एकास अटक
By जितेंद्र कालेकर | Published: August 02, 2018 10:16 PM
प्रेमप्रकरणातून एका सुरेंद्र मिश्रा या तरुणाचे अपहरण झाल्यानंतर तो गूढरित्या बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी वकीलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने भास्कर नारंगीकर याला अटक केली आहे.
ठळक मुद्देवकीलाला मिळाला अंतरीम अटकपूर्व जामीनतरुणाला बेदम मारहाण करुन अपहरणबेपत्ता झाल्याने गूढ वाढले