लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अतिगोड पदार्थ किंवा चॉकलेट्स खाण्याचे प्रमाण वाढल्याने लहान मुलांमध्येही दातांचे आजार समोर येत आहेत. पालकांकडून दुधाच्या दातांची नीट निगा राखली जात नसल्याने लहान मुलांचे दुधाचेच दात किडण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दंतचिकित्सकांकडून सांगण्यात आले.
१) चॉकलेट्स न खाल्लेलेच बरे
मोठेदेखील चॉकलेट खात असल्यामुळे लहान मुलांनी चॉकलेट खाऊ नये, असे म्हणता येणार नाही. लहान मुलांनी चॉकलेट खावे; पण ते मर्यादित प्रमाणात आणि याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मुळात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, असे मत दंतरोगतज्ज्ञांनी नोंदविले.
२) अशी घ्या दातांची काळजी
चॉकलेट किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर ब्रश करणे किंवा चूळ भरणे अत्यावश्यक आहे. तसेच झोपताना दात घासणे केव्हाही फायदेशीर असते; तर काही दंतरोगतज्ज्ञ हे मिठाच्या पाण्याची चूळ भरण्याचे सल्ले देतात. दात घासण्यासाठी योग्य ब्रश आणि योग्य टूथपेस्ट निवडणे आवश्यक असते. बोटाने दात घासणे टाळावे. दात घासण्यासाठी कोणतीही पावडर न वापरता पेस्टच वापरावी. मोठ्यांच्या टूथपेस्टमध्ये विशिष्ट केमिकल्सचे प्रमाण अधिक असते ते लहान मुलांच्या टूथपेस्टमध्ये वेगळे असते. त्यामुळे सहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या विशिष्ट टूथपेस्टचाच वापर करावा. त्यांना मोठ्यांच्या टूथपेस्ट दात घासण्यासाठी देऊ नयेत,असा सल्ला दंतचिकित्सक यांनी दिला.
३) लहानपणीच दातांना कीड लागण्याचे प्रमाण वाढले आहे. साधारणत: लहान मुलांमध्ये दात किडणे, दात झिजणे, दातांवर डाग पडणे, अचानक दात खूप किडणे, दातांतून पू येणे हे आजार होतात. रात्री दुधाची बॉटल किंवा तोंडात घास पकडून झोपणे, चूळ न भरता झोपणे यांमुळे वरचे व खालचे दातदेखील किडतात. तसेच, लहान मुलांना जास्त प्रमाणात कॅल्शिअम, आयर्नचे सिरप दिले तर त्याचाही दुष्परिणाम दातांवर होतो.