लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे गेल्यावर्षीनंतर यंदाही ऑनलाईनच्या आधारावरच शिक्षण सुरू आहे. अगदी लहान लहान मुलेही आता मोबाईल हाताळत आहेत. शाळा किंवा अभ्यासासाठी मोबाईल हाताळताना मुले अनेकदा भटकतात आणि नको त्या इमेज किंवा व्हिडीओ पाहतात. मुलांनी असे काही अश्लील पाहू नये, यासाठी ठाण्यातील काही शाळांमधील शिक्षकांनी आपल्या वर्गापुरते स्वतंत्र ॲप तयार केेले आहेत. जेणेकरून त्या वर्गातील मुलांनी त्या ॲपवर क्लिक केले की, त्यांना थेट आपला पाठ्यक्रम आणि त्याच्याशी निगडित गोष्टीच दिसतात.
कोरोना काळात शाळा बंद झाल्या. परिणामी ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. सलग दुसऱ्यावर्षीही शिक्षण क्षेत्राला ऑनलाईनचाच आधार घ्यावा लागला. या संपू्र्ण काळात अगदी लहान मुलेही मोबाईल हाताळायला, विविध ॲप सुरू करून त्यात अभ्यास करायला शिकलीत.
दरम्यान, काही फुकटचे ॲप्स बाजारात आले. यामुळे शाळांची आणि शिक्षकांची डोकेदुखी वाढली. हे ॲप मुलांना आकर्षित करतात, पण अनेकदा या ॲपमध्ये मधुनमधून येणाऱ्या जाहिराती, वाजणारी गाणी यामुळे मुलांचे अभ्यासातील लक्ष विचलित होते. मुले वर्ग चालू असताना एकापाठोपाठ एक दुसरे काही पाहण्यात दंग होतात. अनेकदा यात अश्लील जाहिराती, व्हिडीओही असतात. त्यामुळे मुलांच्या मनावरही याचा परिणाम होतो. हे लक्षात घेता, ठाण्यातील काही शाळांतील शिक्षकांनी आपल्या वर्गापुरते आपले अभ्यासाचे छोटे वेगळे ॲप तयार करून घेतले आहे. या ॲपमुळे मुले इतरत्र कुठे भटकण्याचा प्रश्नच येत नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्याही काही शिक्षकांनी हे स्वतंत्र ॲप तयार केले आहेत. त्यांच्या या ॲपची सर्वत्र नोंद घेतली गेली.
---------------
आधीच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो. नेट मिळाले तरी, आर्थिक परिस्थितीमुळे फारसा वापर करता येत नाही आणि त्यात या विविध ॲपमुळे मुलांचे अभ्यासातून विचलित होणारे लक्ष... हे सारे पाहता मी स्वत: माझ्या वर्गासाठी स्वतंत्र ॲप तयार केले. त्यामुळे मुलांनी त्यावर क्लिक केले की, थेट अभ्यासक्रम दिसतो. तसेच इतर जाहिराती, व्हिडीओ येत नसल्याने त्यांचा डेटाही बचत होतो.
- चंदाराणी कुसेकर, ॲप तयार केलेल्या शिक्षिका, जि. प. शाळा, अडीवली
---------------