लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील हिराघाट बोटक्लब, गोलमैदान, इंदिरा गांधी भाजीमंडई यांच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने सल्लागार समिती नेमली असून, तिन्ही वास्तूंचा चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी मंगळवारी दिली. गेल्या आठवड्यात तिन्ही वास्तूंची पाहणी स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांच्यासह नाईकवाडे यांनी केली.
शहरातील वालधुनी नदी किनारी १९९० दरम्यान साडेतीन एकर जागेवर महापालिकेने कॅम्प नं-३ येथील हिराघाट येथे बोटक्लब सुरू केले होते. या ठिकाणी बोटिंगसह सुंदर बाग, मंदिर, भिंतीवर संत, महापुरुष यांचे चित्रे साकारण्यात आली. हिराघाट बोटक्लबमध्ये शेजारील शहरातील नागरिक मुलांना घेऊन विरंगुळ्यासाठी येत होती. कालांतराने बोटक्लब बंद पडले. मात्र अद्याप बोट क्लबचे अवशेष कायम आहेत. बोटक्लबसह गोलमैदानचा काही भाग व इंदिरा गांधी भाजी मंडईचा पुनर्विकास करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. राजा दयानिधी, उपयुक्त अशोक नाईकवाडे यांच्यासह महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी आदींनी घेतला. गेल्या आठवड्यात नाईकवाडे यांच्यासह टोनी सिरवानी यांनी पाहणी केली.
हिराघाट बोटक्लब, गोलमैदान व इंदिरा भाजी मार्केटच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने सल्लागार नेमल्याची माहिती नाईकवाडे यांनी दिली. तिन्ही जागांना राज्य शासनाने सनद दिली असून महापालिकेकडे तिन्ही जागा हस्तांतरित केल्यावर विकासासाठी अडसर येणार नसल्याचे उपयुक्तांचे म्हणणे आहे. महापालिका मुख्यालय इमारत, गोलमैदान, हिराघाट, इंदिरा गांधी भाजी मंडई, आयडीआय कंपनीजवळील कब्रस्तान जागा, व्हीटीसी ग्राऊंड अशा ११ जागांला शासनाने सनद दिली असून गार्डन, उद्यान, महापालिकेची विविध कार्यालये अशा १२० पेक्षा जास्त जागांला सनद देण्याची मागणी प्रांत कार्यालयाकडे केली असून सर्वांना सनद मिळण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले. एकूणच सर्वच महापालिका मालमत्तांना सनद मिळाल्यावर त्यांचा विकास करता येणार असल्याचे उपायुक्त नाईकवाडे म्हणाले.
...............
महापालिकेच्या मालमत्तांना संरक्षण भिंत?
महापालिकेचे अनेक उद्यान, ग्राऊंड, समाजमंदिर, शाळा, पालिका विविध कार्यालय, खुल्या जागा भग्नावस्थेत पडल्या आहेत. तिथे अतिक्रमण होऊ नये म्हणून सल्लागार समिती नेमून त्यांना संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. त्यांच्या विकासाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली.
........................