ठाणे : तब्बल ७४ नागरिकांचा बळी घेणाऱ्या लकी कम्पाउंड दुर्घटनेमध्ये कायमस्वरूपी अंपगत्व आलेल्या एका मजुराचा जबाब मंगळवारी ठाणे न्यायालयासमोर नोंदविण्यात आला. असे आयुष्य जगण्यापेक्षा मला गोळी देऊन मारून टाका, अशा शब्दात अंपगांच्या खुर्चीवर न्यायालयात आलेल्या या मजुराने आपली व्यथा मांडली.शीळ-डायघर येथील लकी कम्पाउंडमध्ये बेकायदा उभारण्यात आलेली सात मजली इमारत ४ एप्रिल २०१३ रोजी कोसळली होती. तब्बल ७४ जणांचा बळी घेणाºया या दुर्घटनेप्रकरणी विकासक, पालिका अधिकारी, नगरसेवक, पोलीस कर्मचारी आणि पत्रकारांसह २७ आरोपींना अटक करण्यात आली होती. न्या. एच.एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात मंगळवारी याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी दुर्घटनाग्रस्त इमारतीवर मजुरी करणाºया राजू जाधव यांचा जबाब न्यायालयासमोर नोंदविण्यात आला. या दुर्घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले होते. जवळपास ११ महिने त्यांच्यावर दक्षिण मुंबईतील गोकुलदास तेजपाल रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यांचे दोन्ही पाय मोडले होते. रूग्णालयात त्यांच्यावर प्लास्टीक सर्जरीदेखील करण्यात आली होती. या दुर्घटनेत जाधव यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. चालता येत नसल्याने अंपगांच्या खुर्चीवर बसून ते न्यायालयासमोर हजर झाले. लकी कंपाऊंड दुर्घटनेने आपले आयुष्य उध्वस्त केल्याचे त्यांनी न्यायालयासमोर खिन्न मनाने सांगितले. असे आयुष्य जगण्यापेक्षा मला गोळी देऊन मारून टाका, असे ते यावेळी म्हणाले. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या बांधकामावर कंत्राटदार लक्ष्मण राठोड याने त्याला कामावर ठेवले होते. लक्ष्मण राठोड याच्या निर्देशानुसार मजुरांचे काम चालायचे. त्यांना दररोजची मजुरीही तोच द्यायचा, असे जाधव यांनी त्यांच्या जबाबामध्ये सांगितले. त्यांनी लक्ष्मण राठोडची ओळख न्यायालयासमोर पटवली. जमील, सलीम आणि इतर भागिदार या प्रकल्पाचे मालक होते, असेही त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. जाधव यांना दोन मुली आहेत. आरोपींनी स्वत:च्या फायद्यासाठी इमारतीचे बेकायदेशीर आणि निकृष्ट दर्जाचे काम केले. आरोपींच्या कृत्यामुळे जाधव यांना परावलंबी आयुष्य जगावे लागत असून, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची प्रचंड वाताहत सुरू असल्याचे विशेष सरकारी वकील शिषिर हिरे यांनी न्यायालयासमोर सांगितले. न्यायालयाने या मुद्यांची खटल्यामध्ये नोंद घेतली. जाधव यांनी त्यांच्यावर झालेल्या उपचाराची काही वैद्यकीय प्रमाणपत्रे न्यायालयासमोर सादर केली. बुधवारी या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार आहे.डॉक्टरांचे जबाब नोंदविलेइमारत दुर्घटनेतील काही जखमींवर कळवा येथील राजीव गांधी रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले होते. त्याअनुषंगाने येथील तीन डॉक्टरांचे जबाब मंगळवारी न्यायालयासमोर नोंदविण्यात आले. त्यांनी दुर्घटनेतील जखमींची शास्त्रोक्त माहिती न्यायालयासमोर मांडली. या खटल्यामध्ये गत महिन्यात बांधकाम मजूर काळू भावसिंग चव्हाण यांची साक्ष नोंदविण्यात आली होती. त्यांनीही कंत्राटदार लक्ष्मण राठोड याची ओळख पटवून, इमारतीच्या बेकायदेशीर कामाची माहिती न्यायालयासमोर दिली होती.
मला गोळी देऊन मारून टाका..., उद्ध्वस्त मजुराची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 2:35 AM